शृंगारतळी : गुहागर - विजापूर राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याच्या चर्चेने या मार्गावरील व्यावसायिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य महामार्गावर वसलेल्या बाजारपेठेत लाखो रूपये खर्च करून व्यावसायिकांनी विकत घेतलेले गाळे व स्थिरावलेले धंदे रस्ता चौपदरीकरणात जाणार, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे.गुहागर ते विजापूर ३२० किमी अंतर असणाऱ्या मार्गावर अनेक बाजारपेठा वसलेल्या आहेत. गुहागरपासून सुरुवात केल्यास तालुक्यातील सर्वांत मोठी शृंगारतळी बाजारपेठ, मार्गताम्हाणे, चिपळूण, खेर्डी, शिरगाव, अलोरे, पोफळी, पाटण, कडेपूर, विटा, जत, विजापूरपर्यंत अनेक लहान मोठ्या बाजारपेठा व रस्त्यालगत घरे आहेत. सध्या गुहागर ते चिपळूण दोन लेनचा मजबूत रस्ता आहे.पुढेही काही ठिकाणी दोन लेन, तर काही ठिकाणी एकदिशा मार्ग आहे. सध्या गुहागर तालुक्यात दाभोळ वीज प्रकल्पवगळता कुठलीही मोठी कंपनी नाही. तवसाळ येथे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम व इंडियन आॅईल यांचा एकत्रित साठ दशलक्ष टनाचा तेल शुध्दीकरण प्रकल्प येणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुहागरात केली होती. मात्र, त्याअनुषंगाने कंपनी सुरू होण्याच्या हालचाली मात्र दिसत नाहीत. त्यामुळे सध्या या मार्गावर त्या प्रमाणात रहदारी नाही. मात्र, भविष्यात या मार्गावर रहदारी वाढू शकते आणि त्यावेळी मात्र या मार्ग चौपदरीकरणाच्या मागणीला आणखीन गती येऊ शकते.चौपदरीकरणासाठी किती कालावधी लागेल, हे कोणी सांगू शकत नाही. मात्र, चार - पाच वर्षे असा मोघम कालावधी सांगितला जात आहे. विशेष म्हणजे या रस्ता प्रकल्पात ज्यांची जागा जाणार आहे, त्यांना मोबदला दांडगा मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे विस्थापन होण्याची भीती आहे. महामार्ग चौपदरीकीरणासाठी शहराला एकास दोन, तर ग्रामीण भागात एकास चार असा दर लागू करण्यात येणार आहे.सरकारी रेडीरेकनरच्या दुप्पट मोबदला शहरात, तर ग्रामीण भागात चारपट मोबदला मिळणार आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना घाटात ३० मीटर रूंदी, शहरात ४५ मीटर रूंदी, ग्रामीण भागात ६० मीटर रूंदीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. (वार्ताहर)सांगलीतून मागणी : लोकप्रतिनिधींनीही लावला जोरविशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकांची चौपदरीकरणासाठी विशेष मागणी होती. त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनीही चौपदरीकरणासाठी विशेष जोर लावला होता आणि ही मागणी तडीस नेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही मागणी करण्यास सुरुवात केल्याने हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग होण्याची चिन्हे आहेत.चौपदरीकरण गरजगीते यांनी घोषणा केल्याप्रमाणे भविष्यात खरोखरच पेट्रोलियम कंपनी अस्तित्त्वात येईल व चिपळूण कराड रेल्वे मार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मात्र या मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज भासणार आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग?
By admin | Published: February 10, 2016 11:27 PM