गुहागर : गुहागर तालुक्यात कलिंगडासारखे ‘कॅश क्रॉप’ असलेले पीक मोठ्या प्रमाणात आणि आधुनिक पद्धतीने घेतले जाते. कलिंगडाचे क्षेत्र वाढावे आणि तरुण शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा वाढावा यासाठी गुहागर तालुक्यात खास कलिंगडाचा ‘मॉडेल प्रोजेक्ट’ राबविण्यात यावा. कलिंगड लागवडीमध्ये जिल्ह्यात गुहागरचे नावलौकिक व्हावे. किंबहुना गुहागर हा कलिंगड लागवडीचा तालुका म्हणून प्रसिध्दीला यावा. त्याचबरोबर हळद लागवडीसाठी एका गावाची निवड करुन हा प्रकल्प तयार करण्यात यावा. याबाबतच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, या प्रकल्पासाठी आवश्यक अनुदान जिल्हा परिषदेकडून मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी व्यक्त केला.शेवडे यांनी गुहागर दौऱ्यात पंचायत समितीला भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांनी शेती व पशुसंवर्धन योजनांच्या बाबत मार्गदर्शन केले. तसेच काही आदर्श प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही कृ षी अधिकाऱ्यांना दिल्या.हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा, यासाठी गुहागर तालुक्यातील एका गावाची निवड करावी. गावातील प्रत्येक शेतकऱ्याने १ गुंठा हळद लागवड या प्रकल्पातून करावी, अशी सूचना उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांना केली. यासाठी जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाकडून आवश्यक ते अनुदान व सहकार्य करण्याची हमी शेवडे यांनी दिली. पालशेत व अन्य गावांमध्ये सुपारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर फवारणीसाठी गटोर पंचाची आवश्यकता असते व शेतकऱ्यांची यासाठी मागणीही आहे. याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती पौनीकर यांनी उपाध्यक्ष शेवडे यांच्याकडे केली. कृषी समितीमध्ये ठराव करुन गटोर पंपाचा पुरवठा करण्याचे आश्वासन शेवडे यांनी यावेळी दिले.गुहागरसाठी जादा प्रमाणात अवजारे उपलब्ध करुन देण्यात यावीत, अशी मागणी सभापती सुरेश सावंत व माजी सभापती राजेश बेंडल यांनी केली.पाटपन्हाळे येथील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी केलेल्या कलिंगड लागवडीची पाहणी शेवडे यांनी केली. यावेळी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, बी. बी. पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश बेंडल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुहागरात ‘मॉडेल प्रोजेक्ट’
By admin | Published: January 10, 2016 11:43 PM