ओंकार ढवणकणकवली : तालुक्यातील साकेडी गावामध्ये विशाल विजय गुरव यांनी ह्यप्राजक्ता गांडूळ खतह्ण नावाने प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच मार्गदर्शक ठरत आहे. विशेष म्हणजे बेरोजगारांना नवा रोजगार देण्याकरता हा प्रकल्प रोल मॉडेल ठरला आहे.विशाल गुरव यांनी ३४ बाय ४६ फुटांच्या जागेत गांडूळखताचे १८ बेड तयार केले आहेत. या माध्यमातून सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत ते तब्बल १५ टन गांडूळ खताची निर्मिती करतात. गांडूळ खत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल घडविला जातो.गांडुळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाणही कमी होते. जमिनीचा सामू अर्थात पी.एच. योग्य पातळीत राखला जातो. गांडूळ खालच्या थरातील माती वरती आणतात आणि तिला उत्तम प्रतीची बनवतात.
खतामध्ये मसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीड व रोग प्रतिकारक्षमता वाढते. पिकांची वाढ झपाट्याने होते. विषविरहित दर्जेदार शेतीमाल तयार होतो. जमीन पडीक होण्याचे प्रमाण घटते.जमिनीची उत्पादन शक्ती वाढते, जमीन सुधारते. अशी माहिती यावेळी विशाल गुरव यांनी दिली. एका बेडमधून वर्षाला चार टन गांडूळ खताचे उत्पादन मिळते, असेही त्यांनी सांगितले. अत्यंत कमी जागेत मोठ्या प्रमाणावर गांडूळ खताचे उत्पादन घेता येत असल्यामुळे त्यातून चांगला नफा मिळतो. शिवाय गुरांचे शेण, टाकाऊ वस्तू या प्रकल्पामध्ये टाकून त्यापासून गांडूळ खताची निर्मिती करता येते.या खताला चांगली मागणी असल्यामुळे बेरोजगार तरुणांसमोर रोजगाराची एक नवी संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. असे देखील ही विशाल गुरव म्हणाले.