वैभववाडी : शिवडाव (ता. कणकवली) येथील राजेंद्र गंगाराम बोडेकर (वय ३२) या जवानाचा बंदुकीची गोळी सुटून वैभववाडी तालुक्यातील सडुरे-शिराळेच्या जंगलात मृत्यू झाला. राजेंद्र सुटीवर गावी आले होते. शिकारीसाठी ते फोंडाघाट येथील मित्राला घेऊन गुरुवारी रात्री गेले असता रात्री साडेदहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक पद्मजा चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. शिवडाव हे राजेंद्र बोडेकर यांचे मूळ गाव असून, त्यांची पत्नी फोंडाघाट येथे वन खात्यात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे राजेंद्रचे कुटुंब फोंडाघाटमध्ये वास्तव्यास आहे. पंजाबमधील आंबाला सेक्टरमध्ये ते भारतीय सैन्य दलाच्या सेवेत होते. तेथून त्यांनी सहा महिन्यांसाठी कौटुंबिक अडचणीमुळे पुण्यात बदली करून घेतली होती. त्यामुळे सद्या ते पुण्यातील एअर डिफेन्स सेक्टरमध्ये कार्यरत होते. आठ दिवसांपूर्वी सुटीवर फोंडाघाट येथे आले होते.राजेंद्र बोडेकर यांची फोंडाघाट खैराटवाडी येथील कोंडिबा बापू लांबोरे यांच्याशी नुकतीच ओळख झाली होती. लांबोरे यांची सासुरवाडी सडुरे तांबळघाटी येथे असल्याने त्यांना सोबत घेऊन राजेंद्र बोडेकर गुरुवारी रात्री सडुरे तांबळघाटी येथे गेले होते. तेथे त्यांनी संतोष न्हावू बोडेकर यांना सोबत घेत ते शिकारीसाठी शिराळेच्या जंगलात गेले होते. त्यांच्याकडे राजेंद्र यांची परवान्याची ‘सिंगल बॅरल’ काडतूस बंदूक होती. जंगलात काही काळ चालून थकल्यावर एका ठिकाणी विश्रांतीसाठी मोठ्या दगडावर बसले होते. हातातील बंदुकीचा दस्ता जमिनीवर टेकून राजेंद्र उठण्याच्या प्रयत्नात असताना बंदुकीवर जोर पडल्याने अनपेक्षितपणे काडतूस उडून गोळ्या उजव्या बाजूने कमरेच्यावर पोटात घुसल्या. त्यामुळे ते जागीच कोसळले. हे दृश्य पाहून संतोष बोडेकर व कोंडिबा लांबोरे पुरते हादरून गेले. त्यांनी राजेंद्र यांना दोन्ही बाजूंना धरून घटनास्थळाहून सुमारे दीड किलोमीटर रस्त्याच्या दिशेने जंगलातून खाली आणले. मात्र, रस्त्यापासून काही अंतरावर असताना राजेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र यांची पत्नी गर्भवती असून, त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. तसेच त्यांच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. राजेंद्र यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून रात्री मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. (प्र्रतिनिधी)
कणकवलीत जवानाचा बंदुकीची गोळी सुटून मृत्यू
By admin | Published: February 17, 2017 11:15 PM