देवगड: सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला असा समुद्रातून पोहत जाण्याचा विश्वविक्रम कोल्हापूर शाहूपुरी येथील गुरुप्रसाद मोरे ( वय १४ ) याने केला आहे. त्याने तब्बल १९ तास २३ मिनिटे वेळात ९७ किलोमीटर अंतर पार केले.या त्याच्या कौतुकाबद्दल देवगड पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण सचिव राजेंद्र पालकर , अजय पाठक , बाबा परब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला.गुरुप्रसाद मोरे याने एकट्याने मालवण येथून २३ रोजी रात्री नऊ वाजता समुद्रामधून पोहण्यास सुरुवात केली . रात्रभर न थांबता हा प्रवास करत गुरुवार २४ रोजी विजयदुर्ग येथे दुपारी ४.२३ वाजता तो पोहोचला. यावेळी त्याला पोहताना प्रोत्साहन मिळावे म्हणून शिवतेज पवार, यशवर्धन मोहिते, अथर्व माळी, ओंकार म्हाकवे, योगेश केतवडे या सर्वांनी त्याच्या सोबत थोडे अंतर पोहत त्याला साथ दिली.त्याच्यासोबत एका बोटीतून प्रशिक्षक नीळकंठ आखाडे , अजय पाठक व त्याचे वडील हे होते. या त्याच्या यशाबद्दल विजयदुर्ग येथे पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, राजीव परुळेकर, रविकांत राणे, सुप्रिया आळवे संदीप डोळकर यांनी स्वागत केले.वयाच्या १४ व्या वर्षात परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहण्याच्या विक्रमाची नोंद व्हावी हे त्याचे स्वप्न होते. ते त्याने पूर्ण केले.
विश्वविक्रम! गुरुप्रसाद मोरेने सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग समुद्राला १९ तासांत घातली गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 3:58 PM