दोडामार्ग : कारगिल येथे सेवा बजावताना शहीद झालेले दोडामार्ग येथील जवान रमेश महादेव गवस (वय ३६) यांचे पार्थिव बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उसप येथे आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस आणि लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद गवस यांना मानवंदना देण्यात आली. ‘शहीद गवस अमर रहे’ च्या घोषणांनी जनसमुदायाच्या उपस्थितीत वडील महादेव गवस यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. गवस यांच्या पार्थिवावरील तिरंगा वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. रमेश गवस यांचे पार्थिव कारगिल येथून मंगळवारी रात्री ९.३५ वाजण्याच्या सुमारास गोवा-वास्को येथे आणण्यात आले. तेथून पणजी येथील सेक्शन हेड कोट व बुधवारी सकाळी ८.३० वाजता सुभेदार रमेश राऊळ, निदेश राऊळ व सहकारी जवानांनी पार्थिव गवस यांच्या गावी उसप येथे आणण्यात आणले. यावेळी गवस कुटुंबियांच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावून गेले. त्यानंतर पार्थिवाला तिरंगा परिधान करून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. गवस यांच्या पार्थिवावर सुभेदार, पोलीस अधिकारी, तहसीलदार, माजी सैनिक आणि सहकार्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर जवान आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. पाच मिनिटांच्या शोकसभेनंतर गवस यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. शहीद गवस यांचा मृतदेह उसप येथे आणल्यानंतर उसप ग्रामस्थांसह तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. उसपमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. पवार, एस. आर. बोबके, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, माजी सैनिक पतसंस्था दोडामार्गचे रमेश दळवी, उसप सरपंच लक्ष्मण नाईक, गोपाळ गवस, सूर्यकांत परमेकर, फटी गवस, पांडुरंग गवस, महादेव नाईक, सैनिक पतसंस्था सावंतवाडीचे अध्यक्ष दीनानाथ सावंत, सचिव सुभाष सावंत, सैनिकी मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक शांताराम चव्हाण, सुभेदार रमेश राऊळ, निदेश राऊळ, निवृत्त कर्नल सुहास नाईक, कल्याण संघटक रमेश आईर, सुरेश गावडे, वासुदेव राऊळ, विठोबा देसाई, मनोहर राणे, नारायण दळवी, अनिल गवस, मोहन नाईक, लक्ष्मण गवस, दीपक गवस, धनंजय गवस, नरेश गवस आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
गवस यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: June 05, 2014 12:35 AM