कणकवली: गोव्याहून मुंबई दिशेने आयशर टेम्पोमधून बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कणकवली पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. ३२ पोत्यामध्ये भरलेला १५ लाखांचा गुटखा व आठ लाखांचे वाहनही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गलगत जानवली येथील एका चायनीज कॉर्नरसमोर केली. याप्रकरणी वाहनचालक सिराज शब्बीर शहा (३९, रा. झाराप, ता. कुडाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका वाहनातून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. सिराज शहा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (एम.एच.०७-एक्स-०३०५) मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या एका कंपनीच्या गुटख्याची गोवा ते मुंबई वाहतूक करत होता.आयशर टेम्पो जानवली येथील एका चायनीज सेंटरजवळ आला असता पोलिसांनी त्याचे वाहन रोखले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये गुटखा आढळून आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, बापू खरात, पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, रणजीत तबडे यांनी केली.
कणकवलीत १५ लाखांचा गुटखा जप्त, संशयित ताब्यात
By सुधीर राणे | Published: October 03, 2023 4:50 PM