सचिन मोहिते ल्ल देवरूख सकाळी उठल्यानंतर शाळेत जाऊन बालविश्वात रमण्याचा तिचा रोजचा छंद...! गाणं वाजू लागलं की, तिचे पाय आपोआप थिरकायचे. पण हे सारं आता ठप्प झालंय. ‘तिच्या’ गजबजाटाने रंगून जाणारं भायजेंचं घर शांत झालंय. कारण आज पहिल्यांदाच या घराने ‘साक्षी’शिवाय उजाडलेला सूर्य पाहिला. घरातील एक चिमुरडी साक्षी जग सोडून गेली आणि.... साक्षी भायजे...! वय वर्षे सात! सकाळी उठली की, आईकडून स्वत:ची शाळेत जाण्याची तयारी करवून घ्यायची. आईही लाडेलाडे तिची तयारी करवून द्यायची. साक्षीला नृत्याची विशेष आवड. तिने हस्ताक्षर आणि शुध्दलेखनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कमावले होते. त्याचे बक्षीस वितरणही ३० तारखेला झाले. ही तिच्या बक्षिसांची सुरुवात होती, हेच तिचे आयुष्यातील पहिलं बक्षीस आणि शेवटचंही! कारण तीच सुरुवात तिची शेवटची ठरली. कारण साक्षीला आजोबाच्या वयाच्या वृध्दाने निर्घृणपणे मारून टाकलेय. साक्षी आणि तिची चुलत बहीण मयुरी खेळत असताना राघो धनावडे (५५) याने तिला घरी नेले आणि तिच्यावर कोयत्याने वार करून ठार केले. कोणतंही वैमनस्य नाही, कोणताही वाद नाही... तरीही साक्षीवर ही वेळ का आली? याचं उत्तर कायद्याच्या रक्षकांनाही सापडलेले नाही. साक्षीचा ‘खेळ’ अर्ध्यावरती थांबला आणि आयुष्यही! या सगळ्या प्रकाराने तिची चुलत बहीण मात्र खचून गेली. कारण तिच्याशी झालेला तिचा शेवटचा खेळ याच तिच्या शेवटच्या आठवणी!! साक्षी ही नथुराम आणि सरिता भायजे या दाम्पत्याची तीन नंबरची मुलगी. मध्यम कुटुंबात असलेल्या साक्षीची आई घरकाम करते, तर वडील मुंबईत इंडियन वुलन मिल्स चर्चगेट येथे १५ वर्षे नोकरीला आहेत. या संपूर्ण प्रकाराने आई-वडील आणि बहिणीही हादरून गेल्या आहेत. साक्षीच्या जाण्याने केवळ भायजे घरातच नाही, तर अख्ख्या धामापूर गावावर शोककळा पसरलेय. शाळाही सुन्न साक्षीच्या निर्घृण खुनाची वार्ता गावभर पसरली आणि तिची शाळाही सुन्न झाली. कारण गाण्यावर ठेका धरायला साक्षी नाही, शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी नाही. त्यामुळे सोमवारी धामापूर शाळा नं. ६ सोमवारी भरलीच नाही.
अर्ध्यावरती ‘खेळ’ मोडला, अधुरी एक कहाणी!
By admin | Published: February 02, 2016 9:48 PM