ओरोस : व्हीएचएफ यंत्रणेच्या यशस्वीतेनंतर आता दुसरे पाऊल पुढे टाकत आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत एचएएम रेडिओ ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रणालीमुळे दूरसंवादाच्या सर्व यंत्रणा ठप्प झाल्या तरीही संपर्क साधणे शक्य होणार आहे. डिसेंबर महिन्यात शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी याबाबतचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आंगणेवाडी यात्रेत याचा प्रायोगिक प्रयोग केला जाणार आहे.या प्रणालीसाठी सुमारे ६ लाख रुपये खर्च केले जाणार असून प्रशिक्षणाचा टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण केला जाणार आहे. १२ डिसेंबरपासून पुढे येणारा दुसरा व चौथा शनिवार तसेच प्रत्येक रविवार या दिवशी हे प्रशिक्षण होणार असून जिल्ह्यातील ३० प्रशिक्षणार्थींची यादी निश्चित झाली आहे.दरम्यान, या प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील अन्य नागरिकांनी ७ डिसेंबरपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ नितीन ऐनापुरे हे मार्गदर्शन करणार असून, प्रशिक्षणानंतर संबंधितांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना एचएएम रेडिओ आॅपरेटरचा २५ वर्षे कालावधीसाठीचा परवाना दिला जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)थेट संवाद साधणे शक्यकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असणारी अमॅच्युअर रेडिओप्रणाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात लवकरच दाखल होणार आहे. मोबाईलप्रमाणेच हा रेडिओ असणाऱ्या जगभरातील कुठल्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी थेट संवाद साधणे यामुळे शक्य होणार आहे.
एचएएम रेडिओप्रणाली कार्यान्वित
By admin | Published: December 03, 2015 9:30 PM