आचरा : एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या झोपड्या, झोपडपट्ट्यांमधूनच एकमेकांसोबत राहिलेला मुक्त संवाद, चुलीवर जेवणाचा खमंग सुवास आणि लहानग्यांच्या किलबिलाटाने आचरा गावच्या गावपळीचा पहिला दिवस उजाडला. रात्री चंद्राच्या प्रकाशात गप्पांचे फड रंगले होते. गावपळणीच्या निमित्ताने दैनंदिन जीवनक्रमातून मुक्त होत चिंदरवासीय नैसर्गिक पद्धतीने राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत आहेत.शनिवारी दुपारी ढोलांच्या आवाजानंतर गाव सोडलेले चिंदरवासीय सीमेबाहेर स्थिरावले आहेत. आचरा सीमेलगत माळरानावर, मसुरे हद्दीत नदीच्या कुशीला, तर काहींनी वायंगणी गावात आपले संसार थाटले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी ना शाळेचे टेन्शन, ना क्लासची भुणभुण असे गोष्टीतील जीवन अनुभवायला मिळत आहे. युवा वर्गाने थेट नदीपात्र गाठत मासेमारीला सुरूवात केली होती. महिला वर्ग तर आता घरे लगतच असल्याने बसल्याजागेवरून गप्पांचे फड रगवताना दिसत होता. सर्वांनी तिखट जेवणाने गावपळणीची पहिली रात्र जागविली, महिलावर्ग सामुदायिक स्वयंपाकाचा आनंद घेत आहेत.
गावपळणीत हरिनामाचा गजर घालताना दंग झालेले गावकरी
महिलांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये शेजारपणाचे नाते अधिक घट्ट झालेच, शिवाय विचारांची देवाणघेवाणही झाली. इलेक्ट्रॉनिक साधने आणि मनोरंजनाची साधने घराघरात पोहोचली असताना सीमेबाहेर असणारे माणसे मात्र या विजेविनाच वावरताना दिसत होती.व्हॉट्सअॅपच्या जमाना असताना मात्र चिंदर गावपळणीत युवकवर्ग प्रौढांसमवेत मिळालेल्या निवांत वेळेत हरीनामाचा गजर करताना दिसत आहेत. गाव वेशीबाहेर स्थलांतरित होताना चिंदर गावातील ग्रामस्थांनी भजनाची पेटी, तबला,टाळ आपल्यासोबत आणली होती. मिळालेल्यावेळेत मोबाईलसारखे उपकरण बाजूला ठेवून गावातील बुवाला साथ देत गावकरी हरीनामाचा गजर घालताना तल्लीन होताना दिसत आहेत.रोजची घरातील कुणाची कुरकुर नाही की समस्या नाही. जणू काही समस्या शिल्लक नाहीत. अशा मोकळ््यावातावरणात निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद चिंदरवासीय मिळवित आहेत.
गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव जवळपास निर्मनुष्य झाले असून केवळ रस्त्याचावापर करून पुढे जाणार्या वाहनांचीच वर्दळ पहायला मिळते आहे. गावाचे ग्रामदैवत रवळनाथावर नितांत श्रद्धा चिंदरमधील ग्रामवासीयांची आहे. त्यामुळे श्रद्धेने ही परंपरागत गावपळण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू आहे.