महेश चव्हाण -- ओटवणेसह्याद्रीचे डोंगरपट्टे केरळ आणि इतर परप्रांतीयांच्या हाती गेले आहेत. कारण तिथे आपला सामान्य शेतकरी तग धरू शकत नाही. पण घारपी येथील शेतकरी दीपक रघुनाथ गावडे याला अपवाद ठरले आहेत. गावडे यांनी या दुर्गम पट्ट्यातही पपई शेतीची यशस्वी लागवड करीत सर्वसामान्यांसाठी परिश्रमाचा नवा आदर्श घालून दिला आहे.घारपी हा सद्यस्थितीत दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी ग्रामपंचायतीत मोडणारा अतिदुर्गम भाग. विविध शासकीय सुविधांची वानवा असलेल्या या गावात अजूनही एक ते दीड किलोमीटर अंतर पुढे नीरवस्ती भागात दीपक गावडे यांनी नाविन्यपूर्ण पपई शेतीचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. या उंच भागातील थंड वातावरण, वन्यप्राण्यांपासून सुरक्षेची हमी देणारे पीक, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि कमी खर्चात दुबार उत्पन्न देणारे पीक या सर्व बाबी लक्षात घेऊन गावडे यांनी पपई शेती निवडली. त्यासाठी त्यांचे भाऊ नीतेश नारायण गावडे यांनी मुंबईहून इंटरनेटवर माहिती मिळवून त्याचा सखोल अभ्यास केला आणि थेट पुण्याहून ‘तैवान ७८६’ या पपईच्या बियांची मागणी केली. बिया पिशवीमध्ये रूजत घातल्यानंतर जवळपास ३ ते ४ दिवसात त्याला अंकुर फुटू लागतात. या बियांच्या रोपणावेळी थोडा शेणखताचा वापर केला जातो. बियांना अंकुर फुटल्यानंतर २० ते २५ दिवसात जवळपास फूटभर उंची होऊन ते लागवडीसाठी योग्य होतात.या रोपांची लागवड करताना रोपांमध्ये जवळपास एक मीटर अंतर राहील, याची दक्षता घेत दीपक गावडे यांनी तब्बल ८०० रोपे एकरच्या जमिनीत लावली. डोंगर भाग असल्याने त्यांना यासाठी बरीच मेहतन घ्यावी लागली. पपई पिकाला पाण्याची ओलिता जास्त हवी असल्याने ‘स्प्रिंगल सिंचनाचा’ पर्याय निवडला. त्यानंतर पिकाचे खाद्यान्न म्हणजे खत याचा विचार केला असता त्यांनी या शेती लागवडीत तीळभरसुध्दा रासायनिक खताचा वापर केला नसून, पूर्णत: शेती सेंद्रीय खतावर म्हणजे शेणखतावर उभी केली आहे. महिन्यागणिक प्रत्येक झाडाला एक किलो शेण खत आणि पिकांना रोगराई लागू नये, म्हणून गोमुत्राची फवारणी करून गावडे यांनी ‘आॅरगॅनिक’ शेतीचा नवा पायंडा सामान्य शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.जवळपास सहा महिन्यात ही रोपे पाच फुटांची उंची गाठून उत्पन्न देण्यास सुरुवात करते. म्हणजे त्याला फुले आणि फळे येण्यास सुरुवात होते. त्यानंतर अकराव्या महिन्यात फळ परिपूर्ण आकार घेत पिवळसर होण्यास सुरूवात होते. किमान एक ते दीड किलो वजन होईल, अशी २५ ते ३० फळे एका झाडाला लागतात. थोडा अधिक पिवळसर रंग झाल्यानंतर ही पपईची फळे काढावी लागतात. कारण प्रवास, वितरण आणि साठवणूक या तिन्ही गोष्टींसाठी काही दिवस जात असल्याने फळ आतून पूर्णत: परिपक्व होते व ग्राहकांना त्या हव्या त्या स्वरूपात पोहोचते. पपई पूर्णत: पिवळसर होण्याची वाट बघत राहिल्यास त्याचे देठ निकामी होऊन फळे गळून पडतात.जवळपास बाजारभावानुसार १ किलो पपईला २५ रुपये असा भाव आहे. सरासरी आपण २० फळे धरली, तर प्रत्येक झाडाला ५०० रुपये याप्रमाणे ८०० झाडांचे चार लाख रूपये उत्पन्न होते. त्यातील शेणखत, मजुरी, पाणीबिल, इतर खर्च असा पहिल्या वर्षी दीड लाख रुपयांचा खर्च येतो, असे दीपक गावडे यांनी सांगितले.पपई हे पीक सलग दोन वर्षे तरी भरघोस पीक देते. त्यानंतर त्याच्या उत्पादनात कमालीची घट व प्रतीच्या अकारात खूप तफावत आढळते. पहिल्या वर्षीप्रमाणे दुसऱ्या वर्षीही तेवढ्याच आकारात आणि प्रतीत उत्पादन देत असल्याने मेनहत कमी, मात्र कमालीचा फायदा होतो.दीपक गावडे आणि कुटुंबीयांची प्रायोगिक तत्त्वावरील ही शेती यशस्वी झाल्याने त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. यासाठी त्यांचे बंधू लवू रघुनाथ गावडे, नीतेश नारायण गावडे, नीलेश नारायण गावडे आणि कुटुंबातील महिलांनीही खूप मेहनत घेतली आहे. पपईच्या यशस्वी शेतीमुळे पपईच्या लागवडीत विस्तृतीकरण मोठ्या क्षेत्रात करण्याचा मानस गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. तसेच ‘आले’ या पिकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम याच वर्षापासून साकारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंगरातही कष्टाने फुलवली पपईची शेती
By admin | Published: March 06, 2016 10:20 PM