प्रकाश वराडकर- रत्नागिरी --राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे सेनेत पक्षांतर झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी मतदारसंघात येत्या १५ आॅक्टोबरला चौरंगी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. युती, आघाडी न झाल्याने प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे त्यामुळे कोण किती पाण्यात, कोणाची ताकद किती यांचाही जाहीर पंचनामा होणार आहे. परिणामी सर्व पक्षाच्या उमेदवारांसाठी या निवडणुकीचा पेपर सोपा नसल्याने या निवडणुकीत गहिरे रंग भरले आहेत. रत्नागिरी मतदारसंघात चार मुख्य पक्षांसह ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. मात्र, राष्ट्रवादीतून सेनेत गेलेले उदय सामंत, भाजपाचे बाळ माने, कॉँग्रेसचे रमेश कीर व राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा चौघांमध्ये मुख्य लढत होईल. या चौरंगी लढतीतही उदय सामंत व बाळ माने यांच्यातील लढाई ही ‘जिंंकू किंवा मरू’ अशा त्वेषाने लढली जाणार असल्याचे चित्र आहे. ग्रामपातळीवर शिवसेना बळकट आहे. सेनेच्या शाखा ग्रामपातळीवर सक्षम आहेत. त्याचा फायदा उदय सामंत यांना होईल. राष्ट्रवादीतून शिवसेनेत येताना सामंत यांच्याबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. सामंत यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. परंतु अजूनही त्यांनी आपण राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळालेला असताना शिवसेनेत का प्रवेश केला, याबाबत प्रभावी खुलासा केलेला नाही. त्यांच्या पक्षबदलाच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनातील संशयाची भूमिका कायम आहे. आपल्याला पाडण्यासाठी षडयंत्र रचल्यामुळे आपण सेनेत आल्याचे सामंत यांनी सांगितले असले तरी तपशिलातील भूमिका १९ आॅक्टोबरला निकालानंतरच बोलेन, असे सांगितले आहे. ते आपली भूमिका मोकळेपणाने मांडत नसल्याने त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमध्येही संशय निर्माण झाला आहे. त्यातच सेनेतही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.एकिकडे सामंत यांची ही स्थिती असताना त्यांचे मुख्य स्पर्धक ज्यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये सामंत यांनी पराभूत केले आहे ते भाजपाचे बाळ माने यांनी आपली यंत्रणा मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासूनच राबविली आहे. त्यांच्या विजयासाठी भाजपाचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारीही जोमाने कामाला लागले आहेत. सामंत आपल्या विरोधात आहेत, शिवसैनिक आपले मित्र आहेत, असे पत्रकारपरिषदेत सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. सामंत यांच्या उमेदवारीने सेनेचे पदाधिकारी उत्साही दिसत आहेत, परंतु शिवसैनिकांत नाराजी आहे, अशी चर्चा आहे. ही नाराजी दूर झाली नाही तर त्याचा फायदा माने यांना होऊ शकतो. राष्ट्रवादीतून बशीर मुर्तुझा रिंगणात आहेत. मुस्लिम समाज त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. परंतु हे चित्र मतदानात प्रत्यक्षात उतरणार का? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काही पदाधिकारी अद्याप राष्ट्रवादीतच आहेत. पक्षातून गेलेल्यांची स्थिती काय असेल हे निकालानंतर कळेलच, असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये दिला आहे. त्यामुळे अन्य लोकांप्रमाणेच रत्नागिरीलाही हा इशारा आहे, असे मानले जात आहे. कॉँग्रेसचे बळ या मतदारसंघात यथातथाच आहे. रमेश कीर कॉँग्रेसमधून उभे आहेत. कॉँग्रेसची पारंपरिक मते त्यांच्या बाजूने असतील. एकूणच ही निवडणूक चौरंगी असली तरी खरी लढत भाजपा-सेनेत होईल, असे चित्र आहे.रत्नागिरीएकूण मतदार २,६५,२७९नावपक्षउदय सामंतशिवसेनारमेश कीरकाँग्रेसदिनेश पवारबसपाबशीर मुर्तुझाराष्ट्रवादीसुरेंद्र तथा बाळ मानेभाजपप्रवीण जाधवबहुजन मु. पार्टीउदय सावंतअपक्षमनिष तळेकरअपक्षनंदकुमार मोहितेअपक्षसुनील सुर्वेअपक्षसंदीप गावडेअपक्ष
सर्वच पक्षांसाठी कठीण पेपर!
By admin | Published: October 01, 2014 11:03 PM