कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी विंड्रो कंपोस्टींग बनविण्यात आले. मात्र, त्याचा वापर न करता संबंधित ठेकेदाराकडून त्या कच-याला आग लावून जाळून टाकण्यात येतो. ओला व सुका कचरा वेगळा करण्याची गरज असताना तो एकत्रित टाकला जातो. येथील कच-याला आग लागल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कच-याच्या व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च करून उपयोग काय? असा सवाल नगरपंचायत अधिकाºयांना विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अमित मयेकर यांनी बुधवारी केला.
कणकवली नगरपंचायत गारबेज डेपोला विरोधी नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, लिपिक मनोज धुमाळे, सतीश कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ए.जी. डॉटर्सला जमीन भाड्याने देण्यात आली. या जागेत आता काय चालू आहे? केवळ कुंपण घालून हा प्रकल्प होणार का? याठिकाणी साचलेल्या कचºयाला आग कशी लागली? ठेकेदाराच्या करारात ओला व सुका कचरा वर्गीकरण करून स्वतंत्र जागेत विल्हेवाट लावावी असा उल्लेख आहे.
जर नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जात असेल तर मग येथील स्थिती अशी काय? असे प्रश्न उपस्थित करतानाच या सगळ्या व्यवस्थेला नगरपंचायत अधिकारी व कर्मचारीच जबाबदार आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप कन्हैया पारकर यांनी केला.
यासंदर्भात संबंधित ठेकेदार व नगरपंचायत कर्मचा-यांविरोधात जिल्हाधिका-यांकडे तक्रार करण्यात येईल. ज्याप्रमाणे कचरा उचलणा-या ठेकेदाराबरोबर करार झाला. त्या कराराची अंमलबजावणी होत नाही. केवळ जनतेच्या डोळयात धूळफेक केली जात आहे. याबाबत आम्ही विरोधी नगरसेवक म्हणून या चाललेल्या कारभाराची बोगसगिरी जनतेसमोर आणणार असल्याचेही पारकर व नार्वेकर यावेळी म्हणाले.