सावंतवाडी : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अनेक गावे अधांरात होती. यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच जर यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.यावेळी विद्युत अभियंता विनोद पाटील यांनी आमच्यात काही त्रुटी राहिल्या असतील आम्ही त्या दूर करू पण पावसाळ्यात विद्युत पुरवठा सुरळीत राहिल यांची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. वीज वितरणचा भोगळ कारभाराबाबत गुरूवारी येथील एका हॉटेलमध्ये विद्युत वितरणचे अधिकारी व ग्राहकांची संयुक्त बैठक पार पडली.या बैठकीला माजी आमदार राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, अध्यक्ष सीताराम गावडे, शिंदे सेनेचे अशोक दळवी, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, माजगाव उपसरपंच बाळू वेझरे, दिलीप भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, सावंतवाडी भाजपा मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे आदीसह शेकडो वीजग्राहक उपस्थित होते.सुरूवातीपासूनच विद्युत वितरणच्या गैरकारभारा विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या. बैठकीत ग्राहकांनी तक्रारीची जंत्री मोजली. एका पाठोपाठ एक ग्राहक आक्रमक होत गेला. अभियंता पाटील यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेत विद्युत वितरणच्या गलथान कारभाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच कामात सुधारणा होईल असे आश्वासन दिले.प्रिपेड मिटर विरोधाचा एकमुखी ठराव अॅड. संदीप निंबाळकर तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रिपेड वीज मिटर विरोधी ठराव मांडला त्याला सर्वानी एकमुखी पाठिंबा दिला. प्रिपेड मिटर जिल्ह्यात आणल्यास शासन उधळवून लावायची ताकद ग्राहकांत असल्याची भावना साळगावकर यांनी बोलून दाखवली.
ग्राहकांची विद्युत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती, सावंतवाडीत सर्व पक्षीय बैठक
By अनंत खं.जाधव | Published: May 30, 2024 6:11 PM