गेल्या काही दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, ओहोळांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झालेली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात एक थरारक घटना घडली. रत्यावर आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढत घरी जात असलेला एक तरुण पुरात अडकला. रात्रीची वेळ आणि पाणी वाढत असल्याने तो घाबरून जवळच्या झाडावर चढून बसला. सुदैवाने पुरात तरुण अडकला असल्याची माहिती मिळताच जवळच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत पुराच्या पाण्यात उतरून या तरुणाचे प्राण वाचवले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील इतर भागांप्रमाणेच वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-होडावडा गावांना जोडणाऱ्या पुलावर पुराचे पाणी आले होते. या पाण्यातून वाट काढत तुळस गावातील सिद्धेश परब हा तरुण घराकडे जात होता. मात्र पुलाजवळ असलेल्या रस्त्यावर अचानक पाणी वाढल्याने पाण्याच्या वेगवान झोतामुळे त्याची दुचाकी वाहून गेली. मात्र त्याला झाडाचा आधार मिळाल्याने तो तिथे बसून राहिला. मात्र पुराचे पाणी वाढत गेल्याने त्याला बाहेर पडता येईना.
दरम्यान, नदीवरील पुलाजवळ एक तरुण अडकला असल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर पुराच्या पाण्यात उतरून ग्रामस्थ सदर तरुण बसला होता त्या ठिकाणी पोहोचले. मग या तरुणला दोरीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने पुरात अडकलेल्या या तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही.
पुरातून सुखरुपपणे सुटका झाल्यानंतर या तरुणाने सांगितलं की, मी भावाला सोडण्यासाठी रेल्वेस्टेशनवर गेलो होतो. तिथून परतत असताना तळवडे येथील पुलावर पाणी असल्याने मी मातोंड होडावडा मार्गे जायचं ठरवलं. इथे आलो तेव्हा पुलावर फारसं पाणी नव्हतं. मात्र पुढे वळणावर पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरात आला. त्यात दुचाकी वाहून गेली. मात्र मी जीव वाचवण्यासाठी झाडावर चढून बसलो. त्यानंतर ग्रामस्थांनी माझी सुटका केली.
दरम्यान, या तरुणाची पुराच्या पाण्यातून सुटका करण्याच्या कामात मातोंड येथील होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णू मातोंडकर ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोहिते, कृष्णकांत घोगळे, विशाल घोगळे, अनिकेत जोशी, राहुल प्रभू, गिरीश प्रभू, सौरभ घोगळे, सुहास घोगळे, बाळा मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.