कणकवली : अधून मधून पडणारा पाऊस तसेच कडक ऊन यामुळे कणकवली तालुक्यात तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तापसरीचे जास्त रुग्ण आढळलेल्या गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण हाती घेतले असून खबरदारीच्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत.बदलत्या वातावरणामुळे अनेकांच्या प्रकृतीमध्ये बदल घडत आहेत. काही गावात दूषित पाण्यामुळे काविळीसारख्या साथी पसरत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र ग्रामस्थांनी घाबरून जावू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे, शिरवल, साकेडी आदी गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. आरोग्यसेवक तसेच अन्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरही ग्रामस्थाना मार्गदर्शन करीत आहेत. पाणी उकळून तसेच गाळून पिण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेडिक्युअरचे ड्रॉप पुरवून त्याचा एक थेंब पाण्यात टाकण्याबाबत सांगण्यात आले आहे. दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दर दिवशी दोनशे ते अडिचशे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यापैकी किमान ५0 रुग्ण तापसरीचे असतात. मात्र किरकोळ ताप येणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात येते. तसेच प्रकृतीची काळजी घेण्याविषयी त्यांना सूचना देण्यात येत असते. त्यामुळे तापसरीला घाबरून न जाता शासकीय रूग्णालयांमध्ये योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (वार्ताहर)जिल्ह्याबाहेर अन्य ठिकाणी गेलेल्या काही जणांना डेंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेर गावी जावून आलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ताप येत असेल तर शासकीय रुग्णालयात उपचार करुन घ्यावेत. अशा रुग्णाना औषधे कमी पडू नयेत, यादृष्टीनेही नियोजन केले आहे.- डॉ. कुबेर मिठारी, तालुका आरोग्य अधिकारीडासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहनघराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून कोणताही ताप असला तरी रुग्णांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात यावे,असे आवाहन केले आहे. पावसाचे पाणी साचल्याने डासांची पैदास जास्त होते. या डासांमुळे अनेक साथी पसरत असतात.त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याबाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. चार दिवसांहून अधिक काळ ताप येत असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे प्लेटलेटची संख्या कमी असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी दाखल करुन घेतले जात आहे. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातही पाठविले जात आहे. - डॉ. श्रीधर जाधव, प्रभारी वैद्यकीय अधिकारी
तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क
By admin | Published: August 27, 2015 11:46 PM