सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी व एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील कर्मचारी सक्रिय सहभागी झाले आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले.जिल्हा परिषद स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य संघटनेकडून वारंवार शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, शासनाकडून या मागण्यांबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने १ आॅक्टोबरपासून अहवाल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी १ आॅक्टोबरपासून या अहवाल बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा सिंधुदुर्गतर्फे दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद सावंत, सरचिटणीस प्रकाश तेंडोलकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.