चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. न्यायाधीश प्रकाश नाईक यांनी ही सुनावणी आपल्यासमोर न चालवण्याचा शेरा दिल्याने आता ही सुनावणी आज, गुरुवारी उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशांसमोर होणार आहे. दरम्यान, चिपळूण येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींची रत्नागिरी विशेष कारागृहात रवानगी करण्यात आली. खेड जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयाने नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे बुधवारी राणे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. ज्या न्यायालयासमोर हा अर्ज सुनावणीसाठी होता तेथील न्यायाधीश प्रकाश नाईक यांनी ‘नॉट बिफोर मी’ असा शेरा दिल्याने त्यांच्यासमोर सुनावणी झाली नाही. आता राणे यांच्या अर्जावर आज, गुुरुवारी दुसऱ्या न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे. संदीप सावंत यांना झालेल्या मारहाणप्रकरणी चिपळूण पोलिसांनी तुषार पांचाळ, कुलदीप खानविलकर, मनीष सिंग, अण्णा ऊर्फ जयकुमार पिल्लई या चार आरोपींना दि. २ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रथम दि. ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्या दिवशी त्यांची कोठडी दि. ९ मे पर्यंत वाढविण्यात आली. दि. ९ रोजी न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर ओळख परेडच्यावेळी संदीप सावंत व त्यांच्या कुटुंबीयांनी अपर तहसीलदार देशमुख यांच्या आरोपींना समोर ओळखले. बुधवारी खेड जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. आता या अर्जावरील पुढील सुनावणी दि. १६ मे रोजी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीनंतर चारही संशयितांची रवानगी रत्नागिरीतील विशेष कारागृहात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नीलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
By admin | Published: May 11, 2016 11:26 PM