कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उशिराने म्हणजेच १२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे तरी उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत .सिंधुदुर्गात गतवर्षी २९ मे रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. आतापर्यंतची स्थिती पाहिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: ७ जूनला मान्सूनचे आगमन होते. यावर्षी मात्र मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. केरळमध्ये मान्सूनने धडक दिल्यानंतर १ ते २ दिवसांत मान्सूनची चाहूल सिंधुदुर्ग व गोवा राज्याला लागते. त्यानंतर पुढे ८ ते १० दिवसांनी तो सक्रिय होतो. यंदाचा मान्सून गतवर्षीपेक्षा उशिराने दाखल होणार असल्याने तेवढेच दिवस उष्णतेच्या झळा जिल्हावासीयांना सहन कराव्या लागणार आहेत.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात आणखी दोन आठवडे उष्णता कायम राहणार आहे. तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५ ते ३८ अंश सेल्सिअसएवढे कमाल तापमान अनुभवायला मिळत आहे. ते पुढील आठवड्यात पुन्हा ३९ ते ४० अंशपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.मान्सूनचा अंदाज येताच पावसाळी बेगमीच्या कामांची तयारी सर्वत्र सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यात या कामांना वेग आला आहे. वीज महावितरणनेही मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ८ ते १० दिवसांनी मान्सून उशिराने दाखल झाल्यास त्याचा खरीप हंगामावर फारसा परिणाम होणार नसला तरी काही भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. त्यासोबतच फळझाडे, पशुधन यावरही परिणाम झालेला दिसून येणार आहे. त्याचा फटका शेतकरी, बागायतदार याना बसणार आहे.दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. टोपी, रुमाल, छत्री अशा वस्तूंचा वापर करून उन्हापासून बचाव केल्यास उन्हाचा थोडातरी त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे आरोग्यावर परिणाम होणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्मा वाढला, बेगमीसाठी नागरिकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:17 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उशिराने म्हणजेच १२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे तरी उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत .
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्मा वाढला बेगमीसाठी नागरिकांची लगबग