कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यातील विविध भागात आज, बुधवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. अचानक पाऊस पडू लागल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली.या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा-काजू बागायतीसह सुरंग व्यवसायावर होणार आहे. आधीच शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलांमुळे चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने ते हवालदिल झाले आहेत. मागील काही महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू हंगाम लांबणीवर गेला होता. त्यामुळे यावर्षी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी येण्यास उशीर झाला आहे. तर आता पुन्हा अवकाळी पाऊस दाखल झाल्याने हातातोंडाशी आलेले उत्पन्न सुद्धा निसटण्याची शक्यता आहे.दरम्यान, बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील व्यापारी, भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली . ढगांच्या गडगडाटासह चांगला पाऊस झाला. अधून मधून विजाही चमकत होत्या. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.
कणकवलीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:05 PM