कणकवली : कणकवली तालुक्यात काल, शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कणकवली ते आचरापर्यंत जाणाऱ्या मार्गावर वरवडे येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले होते. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तंडुब भरले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यावर जोरदार हजेरी लावली. परिमाणी जानवली व गडनदीच्या पाण्यात वाढ झाली. जानवली नदीचे पाणी आचरा रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे काहीसे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे यापरिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही मागे फिरावे लागले. गडनदीवरील केटी बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत.कणकवली मराठा मंडळ नजीक असलेल्या केटीबंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे लाकडाचे ओंडके बंधाऱ्यात अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे ते बंधाऱ्याला आदळत असल्याने बंधारा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओंडके काढून टाकण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पाणी आलेल्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करत ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.
sindhudurg: कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम!; जानवली, गडनदी पाणी पातळीत वाढ
By सुधीर राणे | Published: July 22, 2023 1:21 PM