सुधीर राणेकणकवली : गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या वरुण राजाने काल, शुक्रवार पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे कणकवली आचरा मार्गावर वरवडे सेंट उर्सुला शाळेजवळ गडनदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कणकवली तालुक्यात काल, शुक्रवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.कणकवली शहरारील जानवली नदीवरील गणपती साणा येथेही काही प्रमाणात पाणी भरले आहे. जानवली व गड नदी दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली ते आचरा मार्गावर मोठ्या पुराच्या वेळी कायमच पाणी येऊन वाहतूक ठप्प होते. दरम्यान, सेंट उर्सुला शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. तर आचरा मार्ग बंद झाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली.बावशी गावात घर कोसळलेवागदे मध्ये देखील काही घरांना पुराच्या पाण्याने वेढले असल्याची माहिती वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांनी दिली. तर बावशी गावामध्ये सत्यवान मोर्ये यांचे मातीचे घर कोसळून २ लाख १०हजार रुपयांचे नुकसान झाले. नांदगाव तलाठी अलकुटे यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.
सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यात पावसाची संततधार; आचरा मार्गावर गडनदीचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 1:16 PM