महेश सरनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्री पासून जोरदार कमबॅक केले. पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, ओहोळ तुडूंब भरून वाहू लागले आहेत. यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा पासून ज्या पद्धतीने पाऊस कोसळत आहे हे पाहता पुन्हा सरासरी गाठायला पावसाला वेळ लागणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४५०० ते ५००० मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४७०० मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत अधूनमधून पाऊस कोसळत होता. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही. उलटपक्षी अवकाळी पावसामुळे अनेक क्षेत्राला मोठा फटका बसला होता.
गतवर्षी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तीन ते चार वादळे धडकल्याने मोठे नुकसानही झाले होते. यावर्षी जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे चिंता पसरली असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदारपणे कमबॅक करत सर्व बॅक लॉग भरून काढला. मात्र, जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस गायब झाला. त्यामुळे पावसाच्या अनिश्चितेबाबत चिंतेचे वातावरण होते.
दोन हजारांचा टप्पा पार
पावसाने जिल्ह्यात आजमितीला दोन हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही ६० टक्के पाऊस पडणे बाकी आहे. आता ऑगस्ट मध्ये पाऊस किती पडतो. त्यावर पुढील सरासरी अवलंबून असणार आहे.
गणेशोत्सवावर पावसाचे सावट
जिल्ह्यात सर्वांत मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. घराघरात, कुटुंबात हा सण आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा केला जातो. लाखो चाकरमानी गावागावात दाखल होतात. मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण साजरा करताना बंधने होती. यावर्षी बंधनमुक्त झाल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. परंतु आताची परिस्थिती पाहता ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालण्याची दाट शक्यता आहे.