मालवण : गेले काही दिवस शांतपणे बरसणाऱ्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मालवण-कसाल राज्यमार्गावरील कुंभारमाठ जरीमरी उतारावरील संरक्षक भिंत घळणीसह सुमारे ४० फूट खोल कोसळल्याची घटना घडली, तर शहरातील सर्व भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ‘जलप्रलया’ची स्थिती निर्माण झाली होती. संततधार पावसामुळे मालवण शहरातील देऊळवाडा, आडवण, रेवतळे, गवंडीवाडा, धुरीवाडा, आदी भागात पाण्याचे साम्राज्य पसरले होते. देऊळवाडा तसेच सागरी महामार्गानजीकच्या घरांना लगतच्या मळ्यातील पाण्याने वेढा दिला, तर आडवण परिसरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. मालवण तालुक्यात रात्रभर तब्बल ७२ मिलिमीटर पाऊस बरसला असून, आतापर्यंत ६०३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. शहरातील देऊळवाडा व कुंभारमाठ रस्त्यावरील घळण कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची १५ मीटर लांबीची संरक्षक भिंत सुमारे ४० ते ५० फूट खोल भागात कोसळली. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर याच पडझडीत अनेक झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली. खैदा-आडारी मार्गावरीलही घळण कोसळल्याची घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत एकेरी वाहतूक सुरू ठेवली. यावेळी नायब तहसीलदार सुहास खडपकर, तलाठी डी. एस. तेली, मंगेश तपकीरकर, अरुण वनमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नितीन दाणे, किरण शिंदे, सुभाष चौकेकर, नंदू साळकर, पोलीस कर्मचारी संतोष गलोले, हरिश्चंद्र जायभाय, एस. टी. पवार, सूरज ठाकूर, स्वाती जाधव, सिद्धेश चिपकर यांनी दुर्घटनेची पाहणी करीत मार्गावरून एकेरी वाहतुकीस मार्ग मोकळा केला.
मालवणात मुसळधार पाऊस
By admin | Published: June 19, 2017 12:36 AM