सिंधुदुर्ग : ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू असतानाही अजूनही पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सह्याद्री पट्ट्यातील कणकवली आणि परिसरात दमदार पाऊस कोसळला आता बुधवारी सह्याद्री पट्ट्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव आदी परिसराला सायंकाळी १ तास पावसाने धुऊन काढले. त्यामुळे भातकापणी पुन्हा एकदा खोळंबली आहे.जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात न दिल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे. अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव आदी परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरूवात केली. पुढील तासभर पाऊस कोसळत होता. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीतून बचावलेली काहीशी भातशेती ताब्यात घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात होता. मात्र, गेले दोन दिवस सायंकाळच्या सत्रात कोसळणाºया पावसाने शेतक-यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकसानभरपाई अद्यापही नाहीशासनाकडून भातशेती नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, भातशेतीवर चरितार्थ असणाऱ्या येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी निसर्गाची अवकृपा झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस या ठिकाणी पडतो. यावर्षी मात्र, तो अगदी जुलै महिन्याप्रमाणे कोसळत आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी साचत असून त्यातून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकी दम येत आहे.
सह्याद्री पट्ट्यात पुन्हा दमदार पाऊस, ९५ टक्के भातपीक वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:54 PM