वैभव साळकरदोडामार्ग : बुधवारी रात्रभर कोसळणाऱ्या संततधार पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपून काढले असून सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सगळेच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भेडशी येथील दोन्ही पुलांवर पुराचे पाणी आले असून या पुराच्या पाण्यात दोन गाड्या अडकल्या. यातील एक गाडी चंदगड येथील असून दुसरी कार उत्तरप्रदेश येथील आहे. या दोन्ही गाड्यात अडकून पडलेल्या चौघांनाही दोडामार्ग पोलीस व भेडशी येथील स्थानिक युवकांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन वाचविले.
मशनु गंगाराम कांबळे (वय ३०) ज्ञानेश्वर नागोजी (२५, दोघेही रा .आसगाव नांदोडे ता. चंदगड) तर मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी (रा.उत्तरप्रदेश) अशी या युवकांची नावे आहेत.काल, बुधवारी रात्रीपासून दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे तिलारी नदीसह इतर सर्वच नदी - नाल्याना पूर आला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भेडशी येथील मुख्य पूल व पर्यायी पूल पाण्याखाली गेले आहेत. उत्तरप्रदेश येथील एका कारचालकाने पुराच्या पाण्यात गाडी घातली. पाणी जास्त असल्याने कार पाण्यात अडकली. तेव्हा या गाडीत दोघेजण होते. भीतीने ते आरडाओरडा करू लागले. एवढ्यात त्यांच्या पाठीमागून चंदगड येथील पिकअप गाडी आली. समोर कार पाण्यात अडकल्याचे पाहून त्यांनी त्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचविण्यासाठी पीक अप पुराच्या पाण्यात नेली आणि तीसुद्धा अडकली. याबाबतची माहिती दोडामार्ग पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतरी, उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस हवालदार विठोबा सावंत, दीपक सुतार, गजानन माळगावकर, अनिल कांबळे, व भेडशी येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. रिंग व दोरखंडाच्या मदतीने पाण्यात अडकलेल्या चौघांनाही सुखरूप बाहेर काढले.