वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, सलग पडणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा वाढला होता.दुपारी तीन वाजल्यापासून पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. वैभववाडीचा आठवडा बाजार असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला आपली दुकाने थाटली होती.पावसाची रिपरिप सुरू होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ झाली. अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसात भिजून नुकसान झाले. शहरात अर्धा तास पाऊस सुरू होता. आंबा, काजू हंगाम बहरात असताना पाऊस झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. पावसामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रात्री पुन्हा पाऊस कोसळलाबुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर विजांचा कडकडाट झाला. त्यानंतर पुन्हा रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास वीस मिनिटे मोठ्या सरी कोसळल्यामुळे उशिरापर्यंत वीजही गायब झाली होती.
विम्यासह शासनाने नुकसानभरपाई द्यावीवळवाच्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील आंबा पीक पूर्ण धोक्यात आले आहे. तर काजू पिकाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बागायतदारांना फळपीक विमा तसेच शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.