मालवण- कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून जोरदार बरसत आहे. मालवणात ढगफुटीसदृश कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केलं असताना सखल भागातील अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने अनेकांचे संसार पाण्यावर तरंगत होते. बुधवारी सायंकाळपासून पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मालवण शहरासह लगतच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान, सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे दलदलयुक्त जमीन होऊन अनेक ठिकाणी झाडे उन्मळून कोसळत आहेत. मालवणात आठवडाभरात दुसऱ्यांदा ३४५ मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडला असून आतापर्यंत १५२६ मिलीमीटर पावसाची नोंद तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने थैमान घातले आहे. विशेषत: किनारपट्टी भागात अधिक प्रमाणात पाऊस कोसळला आहे. देवगड व मालवण तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळपासून पुन्हा मुसंडी मारली. रात्रभर वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू असल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले. रात्रीच्यावेळी घरात पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाºयांचे नुकसान झाले. रेवतळे, वायरी गर्देरोड, दांडी, देऊळवाडा, आडवण हे भाग पाण्याखाली गेले होते.
पावसाचा रौद्रावतार मालवण शहराला अनुभवता आला. सतत कोसळणाऱ्या पावसाने साऱ्यांची धावपळ उडविली. शहरातील दांडी, आडवण, रेवतळे या भागातील नागरिकांना पहाटे घरात घुसणाऱ्या पाण्याशी दोन हात करावे लागले. यात दादा मांजरेकर, पडवळ व बांदिवडेकर कुटुंबीयांच्या घराभोवती पाच ते सहा फूट पाण्याचा वेढा गुरुवारी दुपारपर्यंत कायम होता. वायरी परिसरातील भिवा शिरोडकर यांच्या घरात पाणी घुसल्याने विद्युत उपकरणे व अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले. तर दांडी परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले. यात हिरवा बत्तीनजीक जॉन डिसोझा यांच्याही घरात पाणी घुसले.
मालवण बंदरजेटीनजीक मालवणकर कुटुंबीयांचे घर पहाटेच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. यात नम्रता व सायली मालवणकर या दोघी बहिणी सुदैवाने बचावल्या. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्यांना शेजाºयांनी आसरा दिला. तसेच पेट्रोलपंपासमोरील अरुण चव्हाण यांच्या घराशेजारील दुकानावर झाड पडून नुकसान झाले. बंदर जेटीनजीक सुरक्षित ठेवलेल्या किल्ला प्रवासी होड्या पाण्याच्या प्रवाहात कलंडल्या. मालवण बाजारपेठ येथील मालवणी बझारमधील विविध प्रकारचे धान्य भिजून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. धुरीवाडा येथील मिताली महेश मेस्त्री यांच्या घरात पाणी घुसल्याने वीज उपकरणांसह आठ पाळीव कोंबडे मृत्युमुखी पडले. यात मेस्त्री यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर नांदोस येथे वसंत सुरबा गावडे यांच्या घरावर जांभळीचे झाड पडून नुकसान झाले. यासह अगोस्टीन फर्नांडिस यांच्याही घराच्या भिंती जमीनदोस्त होऊन दोन लाखांचे नुकसान झाले.
आडारीमार्गे वाहतूक वळविलीमालवण-कसाल राज्यमार्गावरील देऊळवाडा भागात पाण्याचा जोर गुरुवारी दुपारपर्यंत कायम असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर देऊळवाडा-आडारीमार्गे फोवकांडा पिंपळ अशी वाहतूक वळविण्यात आली होती. दरम्यान, आडारी देऊळवाडा भागात वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, अन्य ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरणकडून मेहनत घेतली जात होती. पावसाने दुपारपासून उघडीप घेतल्याने पाणी ओसरण्यास मदत झाली.च्मुसळधार पावसाचा तडाखा देवबाग व तारकर्ली या दोन गावांना बसला. तारकर्ली किनारी असलेल्या अनेक घरांत व हॉटेलांमध्ये (न्याहारी निवास) पाणी घुसले. बुधवारपासून पाण्याने वेढा दिला होता. त्यात रात्रभर संततधार पावसामुळे अनेकांची एकच धांदल उडाली. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना ग्रामस्थांनी रातोरात सुरक्षितस्थळी हलविले. देवबाग डिंगेवाडी परिसरात अनेक घरांना पाण्याने वेढा दिला होता. यात रस्त्यानजीक असलेल्या भाई मोर्वेकर यांच्या घरात पाणी घुसल्याची घटना घडली.