वैभववाडी : तालुक्यात मान्सूनच्या मुसळधार पावसाने दमदार सलामी देत दुपारपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळाले. तालुक्यातील बहुतांशी नदीनाले प्रवाहित झाले आहेत. दरम्यान करुळ घाटात किरकोळ दगड रस्त्यावर आले. परंतु त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
मान्सूनचे गुरुवारी (ता.११) जिल्ह्यात दमदार आगमन झाले. शुक्रवारी पहाटेपासून संततधार सुरु झाली. या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे थांबवावी लागली. पहिल्याच दिवशी पावसाने पाणीच पाणी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.तालुक्यातील बहुतांशी नदीनाले प्रवाहीत झाले आहेत. पहाटेपासून सुरु मुसळधार कोसळणारा पाऊस सायकांळी चारपर्यंत बरसत होता. करुळ घाटात किरकोळ प्रमाणात रस्त्यावर लहान लहान दगड कोसळले. मात्र त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. जूनच्या सुरुवातीपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या बहुतांशी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आता मान्सूनचे दमदार आगमन झाल्यामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.