वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याने काजु पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर उष्माघाताने मोहोर सुद्धा करपून गेला आहे. या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार आणि कृषी विभागाकडे केली. तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्याने काजू पिकांचे अतोनात नुकसान केले ले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहोर तापमानवाढीने पूर्णपणे करपून गेला आहे. त्यामुळे शेतकरी पहिल्या टप्प्यातील काजूवरच संपूर्ण मदार होती. परंतु बुधवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत वादळी वारा झाला. त्यामध्ये खांबाळे, नावळे, करुळ आदी गावांमध्ये काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले.उष्माघाताने काहीअंशी सैल पडलेल्या काजूच्या कोवळ्या बी गळून पडल्या. त्यामुळे झाडांखाली कोवळ्या बी चा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय वादळी वाऱ्यामुळे आणखीनच खोलात गेला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. अनेक शेतकऱ्यांना बागेत गेल्यानंतर मोठया प्रमाणात काजू झडून पडल्याचे दिसून आले. हिरव्या पानासह काही झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या आहेत.शेतकऱ्यांनी तहसीलदारांची घेतली भेटकाजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज तहसिलदार सुर्यकांत पाटील यांची भेट घेऊन वादळीवाऱ्यांने झालेल्या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोन दिवसांत पंचनामे सुरु करु : देशमुखवादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांचीही भेट घेऊन पंचनामे करण्याची अशी मागणी केली. त्यामुळे दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.