दापोली : पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यानी कोकणावर नेहमीच अन्याय केला आहे. परंतु आता सत्ता आपली आहे. त्यामुळे शिवसेना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकास केल्याश्विाय गप्प बसणार नाही. कोकणावर आजपर्यंत झालेला अन्याय विकासकामाला भरघोस निधी देऊन दूर करू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. मंगळवारी दापोलीत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांच्या खासगी कार्यक्रमाला आलेले असताना झालेल्या छोटेखानी सोहळ्यात ते बोलत होते.आघाडी सरकारच्या काळात कोकण बकाल करण्याचा घाट घातला जात होता. कोकणावर वीज प्रकल्प लादून कोकणाची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारकडून झाला होता. परंतु अशा प्रकारच्या प्रकल्पाला शिवसेनेचा कायम विरोध असेल. कोकणच्या हिताचे निर्णय घेतले जातील. कोकणातील वाळू उत्खनन, चिरेखाण या रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगाना परवानगी देण्यात आली आहे. आघाडी सरकारने वाळू उत्खनन व चिरा व्यवसायावर बंदी घातल्याने कोकणातील रोजगार डबघाईला आला होता. रोजगारावर आधारित विकास थांबला होता. परंतु या पुढे तसे होणार नाही.आता कोकणातील जमिनी परप्रांतीयांच्या घशात जात असून, कोकणातील जमिनी, डोंगर परप्रांतीय लोक खरेदी करत आहेत. भूमिपुत्रांनो जमिनी विकू नका, जमीन विकून स्थानिक मराठी माणूस कोकणातून हद्दपार होईल. मुंबई परप्रांतीयांनी ताब्यात घेतली असून, मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे. भविष्यात मुंबईसारखी परिस्थिती कोकणच्या नश्बिी येण्याची शक्यता आहे. कोकणातील शेतकऱ्यानी जमिनी विकल्यास आपल्याच भूमीत मराठी माणूस परका झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जमिनी विकू नका, असा सल्ला कदम यांनी यावेळी दिला.या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, नगराध्यक्ष जावेद मणियार, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, पंचायत समिती, खेडचे सभापती अण्णा कदम, संदीप राजपुरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोकणाला निधी देऊन आजवरचा अन्याय दूर करू
By admin | Published: February 11, 2015 10:17 PM