मालवण : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतांमुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष आढळून येत असून वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे कृमी दोषाचा प्रसार होत आहे. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौद्धीक व शारीरिक वाढ खुंटण्यासही कारणीभूत ठरते, असे प्रतिपादन मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी बुधवारी येथील तालुका स्कूलमध्ये बोलताना केले.१० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १० तारीखला आरोग्य विभागाच्यावतीने एल्बडेझॉल या जंतनाशक गोळीचे सामूहिक वाटप ० ते १९ वयोगटातील व्यक्तींना करण्यात येणार आहे. यानिमित्त तालुका स्कूलमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पोळ म्हणाले, भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. भारतामध्ये ५ वर्षांखालील जवळजवळ ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत आणि साधारणत: ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही उपस्थित राहू शकत नाहीत. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.यावेळी प्रास्ताविक करताना आरोग्य सहाय्यक सतीशकुमार उपाणेकर यांनी २० वर्षांपूर्वी जंतनाशक औषध उपलब्ध नव्हते. यावेळी कृमीदोषाचे प्रमाण भयानक होते. कुपोषण, रक्तक्षय तसेच पोट मोठे असणे, हातापायाच्या काड्या झालेली मुले जास्तीत जास्त दिसून येत होती. यानंतर शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालवयातच कृमीदोष निर्मूलन करणाऱ्या गोळ्यांचे वाटप सुरु केले. त्यामुळे आता हे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या मोहिमेसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच आरोग्य कर्मचारी यांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकांनी या दिवशी शाळेतील उपस्थिती व एल्बेडेझॉल गोळी घेतल्याचा पुरावा म्हणून दोनवेळा खूण करावी असे सांगितले.यावेळी डॉ. पोळ यांनी स्क्रीनद्वारे कृमीदोषाचे वास्तव्य, उपचार व काळजी उपस्थितांसमोर मांडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. बी. मुळीक, तालुका आरोग्य अधिकारी सूरज बांगर, वैद्यकीय अधिकारी ए. डी. शिवशरण, बी. जे. पाटील, एस. एस. यादव, मुख्यसेविका एस. एस. गावडे, आर. आर. कदम, एस. एस. सामंत, एस. एस. मालंडकर, यु. पी. खोत यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृमीदोष रक्तक्षय, कुपोषणाचे कारण
By admin | Published: February 06, 2015 12:09 AM