दोडामार्ग : तालुक्यातील मोर्ले, केर गावांत रानटी हत्ती धुमाकूळ घालत आहेत. दिवसाढवळ्या वस्तीत हे हत्ती संचार करीत असल्याने तेथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतीचे नुकसान हत्ती करी असून ग्रामस्थांच्या अंगावरही ते धावून जात आहेत. त्यामुळे या गावातील ग्रामस्थ सतत भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मात्र, वनविभागाने यावर प्राथमिक उपाययोजना सोडल्यास कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शुक्रवारी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी भेट घेऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.चव्हाण यांनी केर चव्हाटा मंदिर येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक जळगांवकर, दोडामार्ग वनक्षेत्रपाल कोकरे, उपसरपंच महादेव देसाई, माजी सरपंच प्रेमानंद देसाई, पोलीस पाटील तुकाराम देसाई, संतोष मोर्ये, उपसरपंच पंकज गवस , गोपाळ गवस, रत्नकांत देसाई, गोपाळ देसाई, मोहन देसाई आदी उपस्थित होते.शुक्रवारी दिवसाउजेडी एक टस्कर चक्क मंदिरात येऊन गेला. त्यावेळी तेथे असलेल्या ग्रामस्थांनी जीवाच्या भीतीने पलायन केले. हत्तींकडून नुकसान सुरू असून त्यांचे वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी केर व मोर्ले गावांत पहाणी केली.
मोर्ले, केर गावांत रानटी हत्तींचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 2:33 AM