दोडामार्ग : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीची मंगळवारी विभागस्तरीय मूल्यमापन समितीने तपासणी पूर्ण केली. संपूर्ण कोकण विभागात अव्वल क्रमांकासाठी कोकण सहाय्यक आयुक्त चंद्र्रकांत यादव पवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत विभागीय मूल्यमापन समितीने ही तपासणी केली.
लोकसभा व विधानसभा आचारसंहिता निवडणुकीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मूल्यांकन कार्यक्रम प्रलंबित होता. तो आता पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम दोन क्रमांक मिळविलेल्या आयनोडे-हेवाळे व हुमरस या दोन ग्रामपंचायतींची विभागीय तपासणी झाली. या समितीत सहाय्यक आयुक्त पवार यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता विजय कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण या त्रिस्तरीय समितीने मूल्यमापन केले. समितीचे विद्यमान सरपंच अश्विनी जाधव यांनी स्वागत केले.
यावेळी तपासणी सहाय्यक लांबर, दोडामार्गचे गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, सहाय्यक बेहेरे, स्वच्छ भारत मिशनचे संतोष पाटील, सुभाष गवस, अर्जुन गवस आदी उपस्थित होते. हेवाळे गावचे तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच संदीप देसाई यांनी मूल्यमापन समितीला गावाने राबविलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाची सविस्तर माहिती दिली. समितीने आवश्यक दप्तर तपासणी, ग्रामस्थांशी संवाद साधून प्रत्यक्ष गावात फिरून पाणीस्रोत, कुटुंब भेटी, शाळा व अंगणवाडीचे मूल्यमापन केले. यावेळी समितीला गावाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य दौलत राणे, सुनील सुतार, पोलीस पाटील स्मृती देसाई, माजी पोलीस पाटील सूर्यकांत देसाई, शंभवी नाईक, दिव्या सावंत, प्रमोदिनी देसाई, संध्या हरिजन, ग्रामसेवक सचिन कांबळे आदी उपस्थित होते.दहा लाख मिळणार ?तत्कालीन सरपंच संदीप देसाई यांनी हेवाळे गावाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून देत ५ लाखांचे बक्षिस मिळविल्यानंतर आता विभागात प्रथम येण्यासाठी आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायत सज्ज झाली असून, यामध्ये यश मिळविल्यास १० लाखांचे बक्षिस ग्रामपंचायतीला मिळू शकते. असे यश मिळविणारी आयनोडे-हेवाळे ही दोडामार्ग तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.सिंधुफोटो ०१आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीची विभागीय तपासणी बेलापूर-मुंबई येथील सहाय्यक आयुक्त चंद्रकांत पवार व अन्य समिती सदस्यांनी केली. यावेळी सरपंच अश्विनी जाधव, संदीप देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.