सिंधुदुर्गनगरी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वे व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण कणकवली, देवगड, वैभववाडी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधून पावसाबद्दलच्या बातमीची खातरजमा करावी. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता आहे. अशावेळी नागरिकांनी संबंधित बाधित व्यक्तीस सहकार्य करावे.नागरिकांनी स्थानिक स्तरावर शोध व बचाव कार्यात सक्रिय रहावे. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरुक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे. पुरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरुक रहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी. जुन्या मोडकळीत आलेल्या इमारती, पूल अशा ठिकाणी जाऊ नये.अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे, जेसीबी मशीन इ. उपलब्ध करुन देण्यात नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग द्यावा. अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ. ठिकाणी जाऊ नये. सध्या जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अतिवृष्टी कालावधीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढण्यास जाऊ नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना नागरिकांनी त्या ठिकाणच्या धोक्यांची जाणीव करुन द्यावी व या पर्यटकांना देखील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यापासून परावृत्त करण्यात यावे. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.अफवांवर विश्वास ठेवू नयेपावसाच्या हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावरुन घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडूनच करुन घ्यावी .
तळकोकणात 11 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 6:06 PM