विनोद पवार- राजापूर--आवड असली की, अनेक गोष्टी सहजपणे साध्य करता येतात. फक्त त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असावी लागते. तशी इच्छाशक्ती असल्यामुळेच राजापूर शहरातील इलेक्ट्ीक व्यावसायिक राजू रानडे यांनी आपल्या कुंभारमळा येथील सुमारे १२ गुंठे जागेत बासमती भाताचे यशस्वीपणे पीक घेतले आहे. कोकणात बासमती जातीचे भात होत नसल्याचा गैरसमज असल्यामुळे येथील शेतकरी सहज होणाऱ्या बासमती भाताचे पीक घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे रानडे यांचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशा देणारा ठरणार आहे. दरवर्षी आपल्या कुंभारमळा येथील जागेत रानडे हे शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करत असतात. यावर्षी आपल्या शेतात बासमती भाताचे पीक घोण्याचे ठरवल्यानंतर रानडे यांनी राजेंद्र भोगवती जातीचे बियाणे कोल्हापूर येथून मागवले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रारंभी त्यांनी लागवड केलेल्या या भाताची वाढ काही प्रमाणात खुंटली होती. त्यामुळे बासमती भात लागवडीचा हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, याबाबत राजू रानडे यांच्या मनात शंका होती. मात्र, त्यानंतर त्यांनी खताची योग्य मात्रा देत पंपाने पाणीही दिले. त्यामुळे काहीशी वाढ खुंटलेले व म्हणावा तसा जोर नसलेले हे भात चांगलेच वर आले. रानडे यांनी लावलेल्या या भाताला आता चांगल्या प्रमाणात केसरे आली असून, एका काडीला सुमारे पाच लोंब्या आल्या आहेत. झालेल्या खर्चाएवढे तरी उत्पन्न मिळेल का? अशी शंका रानडे यांना आली होती. मात्र, खुरपणी व तण काढणी यामुळे उत्पन्नात भर पडली आहे. १२ गुंठे जागेत घेतलेले हे पीक सुमारे २० मण म्हणजे आठशे किलो भाताचे उत्पन्न देईल, असा विश्वास रानडे यांनी व्यक्त केला आहे.
राजापुरात चक्क बासमतीचे पीक
By admin | Published: November 08, 2015 11:12 PM