मालवण : मालवण चिंदर गावातील जलयुक्त शिवार अभियान कामांबाबत माजी सभापती धोंडी चिंदरकर यांनी साशंकता व्यक्त केली आहे. चिंदरमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे एकही काम झालेले नसताना चार लाख १८ हजार रुपये खर्च झालाच कसा? असा सवाल उपस्थित करत संबंधित कामाची आणि संबंधित विभागाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही चिंदरकर यांनी केली आहे. दरम्यान, तालुका कृषी विभागाने चिंदर गावात जलयुक्त शिवार योजनेखाली चार लहान माती बंधारे १५ मे ते २७ मे २०१५ या बारा दिवसांच्या कालावधीत पूर्ण झाल्याचे म्हटले असून याकामी चार लाख १८ हजार प्रत्यक्षात खर्चही झाला असल्याची माहिती ‘कृषी’कडून प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीकडे माहिती उपलब्ध नाहीकेंद्र शासनाच्या पाणलोट योजनेखाली यापूर्वी गावात बंधाऱ्यांची कामे झाली. मात्र, नव्या सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे कामच झाले नसून याबाबत आपण ग्रामसभेत प्रश्नही उपस्थित केला. मात्र, जलयुक्त शिवारची कामे झाल्याबाबत माहिती मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले. चिंदर गावातील या कामाच्या योजनेच्या कामाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे माहिती विचारली असता, नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे योजनेतील कामांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेचे कामच झाले नाहीमालवण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेखाली चार गावांची निवड करण्यात आली. यात कुणकवळे, कर्लाचा व्हाळ, चुनवरे, चिंदर या गावांचा समावेश आहे. या चार गावांत योजनेची २२ कामे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात पूर्ण झाली असून, ५७ बंधारे बांधण्यात आले आहेत. याकामी ५६ लाख ९७ हजार रुपये खर्चही झाल्याचे तालुका कृषी विभागाने स्पष्ट केले. असे असताना चिंदर गावचे रहिवासी व माजी सभापती धोंडी चिंदरकर यांनी चिंदर गावात या योजनेखाली कामच झाले नाही, असे सांगत चार लाख रुपये खर्च दाखवून कोणते चार बंधारे बांधले गेले? असा सवाल उपस्थित केला आहे.
‘जलयुक्त शिवार’ची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
By admin | Published: December 04, 2015 11:37 PM