सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थिती उद्भवली नसली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीने उच्चांक गाठला असून जिल्हाभरातील फक्त घरे व गोठ्यांची पडझड होऊन ९0 लाखांचे नुकसान झाले आहे. यावेळी प्रशाासनाच्यावतीने ४ लाख, ७३ हजार रूपयांचे वाटप केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५३६ घरांची तर ८२ गोठ्यांची पडझड झाली असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाल्याचा कालावधी हा १ जूनपासून धरला जातो. यावर्षीच्या पावसाठी हंगामात पावसाने ७ जूनलाच हजेरी लावली. वेळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा होती, मात्र शेतकऱ्यांसह सर्वाचीच पावसाने घोर निराशा केली. अद्यापही शेकडो मि. मी. पाऊस हा गतवर्षीच्या सरासरी पासून दूर आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात काही दिवस वादळी वाऱ्यासह बरसायला सुरूवात केल्याने नद्यांसह तलावाची देखील पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी पावसापेक्षा चक्री वादळाचा अनुभव जिल्हावासीयांना घेता आला. वादळाने जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. शेकडो घरांवर झाडे पडून लाखोची हानी झाली. त्याचप्रमाणे गोठ्याचीही पडझड होऊन लाखोंची हानी झाली. प्रशासनाकडील प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण ५३६ घरांना वादाळाचा तडाखा बसला असून या घरांची पडझड झाली आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार यात ८० लाख ६२ हजार ६०६ रुपयांचे नुकसान झाले आहे, तर गोठ्यांचे ९ लाख २३ हजार ५६८ रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी) ५३६ घरांची पडझड : पात्र मात्र १७० घरे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करून नुकसानीचा आकडा जाहीर केला जातो. त्याप्रमाणे आपल्याला नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा संबंधीत लोकांची असते. मात्र, शासनाच्या धोरणानुसार ज्या ठिकाणी घरांची किंवा गोठ्यांची पडझड झालेली आहे त्या ठिकाणच्या गावात किमान ५६ मि.मी. पावसाची नोंद असणे आवश्यक असल्याची जाचक अट असल्यामुळे पैकीच्या पैकी नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळत नाही. पावसाच्या या चार महिन्यात तब्बल ५३६ घरांची नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झाली असून त्यातील शासन निकषात बसणाऱ्या १७० घरांना नुकसानीची रक्कम मिळणार आहे, तर पडझड झालेल्या ८२ गोठ्यापैकी २७ प्रकरणे पात्र ठरली आहेत. नुकसानी ९० लाख वाटप मात्र पावणेपाच लाख घरांची व गोठ्यांची मिळून ८९ लाख ८७ हजार एवढी नुकसानी झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनावरून ४ लाख ७३ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. घरांची ३६३ गोठ्यांची ५५ प्रकरणे अपात्र शासनाच्या निकषावर बोट ठेवत प्रशासनाने ५६३ पडझड झालेल्या घरांपैकी तब्बल ३६३ प्रकरणे अपात्र तर गोठ्यांची ८२ पैकी ५५ प्रकरणे अपात्र ठरवत यांना शासनाच्या कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जाचक अट बदलावी ज्या ठिकाणी ५६ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला व तेथील खासगी मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याला शासनाकडून मदत दिली जाते, मात्र त्यापेक्षा कमी पाऊस झाला तर तो नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत राहतो. शासनाची जाचक अट सर्वांनाच मारक असून ही अट शिथल करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.
नैसर्गिक हानीने गाठला उच्चांक
By admin | Published: October 10, 2015 11:45 PM