कुडाळ : पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
चिखलमय महामार्गामुळे वाहने रूतण्याच्या घटना वाढत असून महामार्ग सुस्थितीत करण्याकडे महामार्ग प्रशासन व दिलीप बिल्डकॉन कंपनी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.बुधवारी सकाळी कुडाळ येथील काळप नाका येथील बॉक्स वेलवर ही लक्झरी बस रुतली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावशी ग्रामपंचायत जवळील महामार्गावर गोव्याहून मुंबईकडे जाणारा टेम्पो चिखलमय रस्त्यात रुतून बसला. हा टेम्पो काही केल्या निघेना परिणामी काही क्षणातच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.ही घटना पावशी येथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच टेम्पो बाहेर काढण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला मात्र अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. एका अधिकाऱ्यांने फोन उचलला मात्र त्याने आता येऊ शकत नाही, असे कारण दिल्याचे त्यांनी सांगितले. तर कुडाळ पोलीस ठाण्याला फोन लावून याबाबत माहिती दिली.
मग त्यांनीही याबाबत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कळवितो, असे सांगितले. मात्र काही वेळ झाला तरी कोणीच त्याठिकाणी आले नाही. त्यामुळे काही वेळातच महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या व महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला.दिलीप बिल्डकॉन कंपनीचे कोणीही सदरचा टेम्पो काढण्यासाठी येत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी वाहतूक सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन वाहतूक सोडवण्यास सुरू केली
यावेळी नादुरुस्त असलेल्या व बंद ठेवण्यात आलेल्या मार्गावरून त्यांनी हळूहळू वाहतूक सोडविण्यास सुरू केली. व सुमारे दोन तासानंतर ही वाहतूक पूर्वपदावर आणली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजण्याच्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा दिलीप बिल्डकॉन रवी कुमार यांना फोन लावला. यावेळी कंपनीने त्यांना जेसीबी पाठवतो, असे सांगितले व काही वेळेत तेथे जेसीबी आला व या जेसीबीच्या सहाय्याने सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो बाहेर काढण्यात आला.या ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे वाहनचालक, प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत वाहन चालक, प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून काही ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे वारंवार गाड्या रूतण्याचे तसेच लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.मात्र याकडे महामार्ग प्रशासन तसेच ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन पूर्णपणे दुर्लक्ष करत असून सदरचे हे रस्ते सुधारून ते सुस्थितीत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत.