सिंधुदुर्ग : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या केसीसी ठेकेदार कंपनीच्या गलथान कामामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व आपल्याला न्याय मिळावा यासाठी किसान दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोर खारेपाटण येथील विठ्ठल लक्ष्मण गुरव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आता माघार नाही, असा पवित्रा उपोषणकर्ते गुरव यांनी घेतला आहे.गतवर्षी नडगिवे-खारेपाटण हद्दीवरील पुलाच्या व महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामकाज सुरू असताना नजीकचा नैसर्गिक ओढा माती व दगड टाकून बुजविण्यात आला. त्यामुळे ओढ्याचे पात्र पूर्णत: बंद झाले होते. पावसाळ्यात या ओढ्यातून डोंगरमाथ्यावरील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाहतो; परंतु ओढ्याचे पात्र पूर्णत: बुजविण्यात आल्याने त्या ओढ्याच्या प्रवाहातील पाणी तुंबून नजीकच्या विठ्ठल गुरव यांच्या बागायती शेतजमिनीत घुसण्याची व नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
याबाबत विठ्ठल गुरव यांनी वेळीच महामार्ग ठेकेदार कंपनी, उपविभागीय अधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-रत्नागिरी; सहायक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग-खारेपाटण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-कुडाळ, सरपंच ग्रामपंचायत नडगिवे यांना लेखी निवेदनाद्वारे कल्पना देऊन ही बाब निदर्शनास आणून दिलेली होती. परंतु संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासनाने त्याची दाखल घेतली नाही.तब्बल १५ गुंठे शेतजमीन बाधितपावसाळ्यात ओढ्यातील वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह तुंबून पूर्णत: बंद झाला. हे तुंबलेले पाणी ओढ्यापलीकडील विठ्ठल गुरव यांच्या बागायती शेतजमिनीत घुसले व तेथूनच पाण्याचा नवीन मोठा प्रवाह निर्माण झाला. या प्रवाहामुळे विठ्ठल गुरव यांची सुमारे १५ गुंठे शेतजमीन बाधित झाली. शेतजमिनीतील माती, दगडी कंपाऊंड व लागवड झाडे ही पूर्णत: वाहून गेली आहेत.