सिंधुदुर्ग : रत्नागिरी जिल्हा डोंगराळ असल्यामुळे शहरापासून ग्रामीण भागाचे अंतर अधिक आहे. सध्या उन्हाळी सुटीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. अशावेळी नादुरूस्त एस. टी. बस मार्गावर थांबून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता रत्नागिरी विभागात एस. टी.चे ‘फिरते दुरूस्ती पथक’ वाहन दाखल झाले आहे.
दिनांक २० मे ते १० जूनअखेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या एस. टी. गाड्या नादुरुस्त झाल्यास त्या तत्काळ दुरूस्त करता याव्यात, यासाठी हे ‘फिरते दुरूस्ती पथक’ सेवा बजावणार आहे. आतापर्यंत रत्नागिरी आणि चिपळूण आगारांमध्ये ही फिरती दुरूस्ती पथके दाखल झाली आहेत. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या या दुरुस्ती पथक वाहनामुळे बंद पडलेल्या एस. टी. गाड्या तत्काळ आणि जागेवरच दुरूस्त करणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागातूनही एस. टी. बिघडल्याचे कळताच तत्काळ त्याठिकाणी जाऊन फिरते वाहन दुरूस्ती पथक गाडीच्या दुरूस्तीचे काम करणार आहे.
एखादी एस. टी. मार्गावर धावत असताना अचानक त्यात बिघाड उद्भवल्यास या बंद एस. टी.च्या दुरूस्तीसाठी दुसरी एस. टी. बस व सोबत कार्यशाळेतील कर्मचारी पाठवावे लागतात. परिणामी यामुळे वेळेचा अपव्यय होतोच शिवाय जादा एस. टी. बसही न्यावी लागत असल्याने डिझेलचा भुर्दंड पडतोे, मनुष्यबळही अधिक खर्च होते. ग्रामीण भागात एस. टी. बिघडल्यास व पर्यायी सुविधा वेळेवर उपलब्ध न झाल्यास प्रवाशांचा खोळंबा होतो. नादुरूस्त एस. टी.च्या दुरूस्तीसाठी वेळ खूप जातो, काहीवेळा यंत्रसामग्रीचीदेखील कमतरता भासते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन सुटीच्या कालावधीत रत्नागिरी विभागात दोन फिरत्या दुरूस्ती पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.जाणून घ्या.. : काय आहे या वाहनात?फिरत्या दुरूस्ती पथकामध्ये जनरेटर, एअर कॉम्प्रेसर, टायर पंक्चर कीट, चेन ब्लॉक, व्हॉईस, ड्रिल मशीन, व्हर्टिकल ड्रिल, सर्वप्रकारचे स्पैनल्स, पाण्याची टाकी, इंजिन रिलेटेड कीट, ग्रीस गन, फर्स्ट एड बॉक्स, फायर एस्टिंगविशर आदी सामग्री उपलब्ध आहे. यामुळे ज्याठिकाणी एस. टी. बिघडते, त्याठिकाणीच ती तत्काळ दुरूस्त करणे शक्य होणार आहे.
उन्हाळ्यात लांबपल्ल्याच्या मार्गांवर जादा गाड्या तसेच ग्रामीण भागातही एस. टी. च्या अधिक फेºया असल्यामुळे बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढते. या नादुरूस्त बस मार्गावर थांबू नयेत, यासाठी रत्नागिरी विभागात एस. टी.चे ‘फिरते दुरूस्ती पथक’ वाहन दाखल झाले आहे. बस नादुरूस्त झाल्यास ऐन उन्हात प्रवाशांना ताटकळत दुसºया बसची वाट पाहत तासन्-तास उभे राहावे लागते. त्यामुळे फिरते दुरूस्ती पथक वाहन प्रवाशांसाठी नवी पर्वणी ठरणार आहे.- विजय दिवटे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.
ऐन गर्दीच्या हंगामात नादुरूस्त एस. टी. बस मार्गावर थांबून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता रत्नागिरी विभागात एस. टी.चे ‘फिरते दुरूस्ती पथक’ वाहन दाखल झाले आहे.