कणकवली : वागदे-डंगळवाडी येथे महामार्गाला अतिवृष्टीमुळे भगदाड पडले. चौपदरीकरणासाठी केलेला भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला. शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाच्या उतारावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे भगदाड पडले.
पाण्यासोबत भरावाची माती वाहून ती लगतच्या शेतात घुसल्याने भातशेतीचे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी रात्री भगदाड पडलेल्या भागातून वाहतूक बंद केल्याने अपघात टळला. याची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार व अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी याची पाहणी केली.महामार्ग चौपदरीकरणाला वागदे-डंगळवाडी येथील उताराला शनिवारी रात्री ओहोळाचे स्वरुप आले होते. उताराच्या सुरुवातीला ओसरगावच्या हद्दीत असलेल्या मोरीतून पाण्याचा विसर्ग न झाल्याने पावसाचे पाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहू लागले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या जोरदार पावसानंतर महामार्गावरून वाहत येणारे पाणी भरावावरून लगतच्या शेतात घुसले. महामार्गाला ओहोळाचे स्वरुप प्राप्त झाल्याने त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.
या पाण्यामुळे महामार्गाचा काही भाग खचला. तर काही भागातील मातीचा भराव वाहून गेल्याने भगदाड पडले होते. ग्रामपंचायत सदस्य रुपेश आमडोसकर व स्थानिक ग्रामस्थांनी झाडांच्या फांद्या तोडून महामार्गाच्या दुतर्फा टाकत एका बाजूने वाहतूक बंद केली. महामार्गावर पडलेल्या भगदाडाची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी कणकवली पोलिसांना दिली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस दाखल होत त्यांनी एका बाजूने वाहतूक सुरू केली. रात्री दीड वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.पवार यांची पायपीटडंगळवाडी येथे पडलेल्या भगदाडाची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर तहसीलदार आर. जे. पवार यांनी रविवारी सकाळी या भागाची पाहणी केली. सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत चालत खचलेल्या भागाची तहसीलदारांकडून पाहणी करण्यात आली. वागदे मंडळ अधिकारी व्ही. एम. चव्हाण उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांच्यामते डंगळवाडीच्या उतारावर टाकण्यात आलेले पाईप लहान असल्याने पाणी महामार्गावरूनच वाहत येते.