कुडाळ : कुडाळ हे जिल्ह्याचे सर्वात महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी आवश्यक असणारा महामार्ग येथील शहराच्या विकासाच्यादृष्टीने व्हावा, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती कुडाळवासीयांनी महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिली. तसेच कुडाळ तालुक्यातील चौपदरीकरणाच्या महामार्गासंदर्भात आवश्यक त्या सुधारणाही सांगितल्या. कुडाळ ग्रामस्थांनी कुडाळ तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या महामार्गासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक सोमवारी कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण, आर. पी. धुमाळे या अधिकाऱ्यांसह प्रसाद रेगे, राजू राऊळ, बंड्या सावंत, हेमंत कुडाळकर, संतोष शिरसाट, सत्यवान कांबळी, नीलेश तेंडोलकर, अमृत सामंत, राजन नाईक, सत्यवान कांबळी, बबन परब तसेच कुडाळ शहरातील व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण म्हणाले, कुडाळ तालुक्यातील कसाल ते झाराप याठिकाणी चौपदरीकरणाचा रस्ता होत आहे. यामध्ये कसाल येथे शून्य पॉर्इंटचा रस्ता, तर ओरोस तिठा येथे ब्लॉकवेल बसविण्यात येणार आहे. कुडाळ येथील शहराचा विचार करता भंगसाळ नदीवरील पूल हे सध्याच्या उंचीपेक्षा चार मीटर अधिक उंच होणार आहे. तसेच शहरामध्ये गाड्या येण्या- जाण्यासाठी एसटी डेपोसमोरील महामार्गावर शून्य पॉर्इंटचा रस्ता ठेवण्यात येणार असून, एमआयडीसी येथे वाहने नेण्या-जाण्याकरिताही पॉर्इंटचा रस्ता, तर हॉटेल आरएसएन येथे बॉक्सवेल बसविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच साळगाव येथे पॉर्इंटचा रस्ता ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हायवेमुळे कुडाळ शहराला एक वेगळे महत्त्व मिळावे, कुडाळ हे महत्त्वाचे ठिकाण व्हावे, याकरिता कुडाळ येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आरएसएन हॉटेलकडे वाहनांसाठी भुयारी मार्ग ठेवावा. तसेच राज हॉटेलकडील एमआयडीसी मार्गात विमानतळावर व एमआयडीसीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावर शून्य पॉर्इंटचा रस्ता व्हावा व तिथे सर्कल व्हावे, अशी मागणी केली. कुडाळ येथील महामार्गासंंदर्भात आवश्यक असणाऱ्या मागण्यांबाबत लवकरच येथील ग्रामस्थ या विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. काश्मीर ते कन्याकुमारी हा देशाचा भाग जोडण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा असून येथील विकासासाठी व देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने हा महामार्ग महत्त्वाची जबाबदारी निभावणार आहे. तर शहरी भागात वाहनांचा वेग कमी होणार असल्याने ४५ मीटर तसेच घाटरस्त्यावर ताशी ३० किलोमीटर वाहनांच्या वेगामुळे तेथे ३० मीटर जमीन संपादित केलीजाणार असल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
महामार्गाचे काम शहर विकासाच्या दृष्टीने व्हावे
By admin | Published: May 18, 2015 11:02 PM