सुभाष कदम ल्ल चिपळूण‘वितभर पोटा केवढा हा खटाटोप’ असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात दोनवेळचे अन्न मिळणेही अनेकांना दुरापास्त आहे. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या पारंपरिक कसरती करून जीवन जगणारी अनेक कुटुंब आजही आहेत. चिपळूण येथील नगर परिषदेसमोर बांबू उभे करुन त्यावर दोरी बांधून परातीवर चालणारी एक ९ ते १0 वर्षांची चिमुकली पाहताना अंगावर रोमांच उभे राहात होते. आई, वडील आणि आपल्या दोन लहान भावंडांसह हे कुटुंब लाऊडस्पीकरवर गाणे लावून कसरती करत होते. डोक्याच्यावरून जाणाऱ्या विजेच्या जीवघेण्या तारा, बाजूला असणारा विजेचा खांब अशा जीवघेण्या जागेत केवळ वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबाचा थरारक खेळ सुरु होता. सकाळी १०ची वेळ. जो तो आपल्या कामानिमित्त ये - जा करीत होते. काही कर्मचारी आपल्या कामावर जात होते. अशावेळी रस्त्याच्या एका कोपऱ्यावर दोरीवरून चालणारी ही चिमुकली कोणत्याही गडबड गोंधळाकडे न पाहता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करुन परातीवर चालत होती. परातीवरची फेरी पूर्ण झाल्यानंतर तिने सायकलच्या रिंंगवरची फेरीही सहज पूर्ण केली. हातात बांबू घेऊन आपला तोल सावरत रिंगवरुन चालणे अवघड होते. हे पाहताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकत होते. ही घटना पाहून काहींनी दु:ख व्यक्त केले. आपला देश महासत्ताक बनत असताना देशातील काही पीडित कुटुंबांना शासनाने कितीही योजना राबविल्या तरी दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही. हे वास्तव समोर आले. आज (बुधवारी) चिपळूण येथील हे दृश्य पाहताना आजही सामान्य कुटुंबातील लोकांना पोटासाठी पारंपरिक कसरतींचाच आधार घ्यावा लागतो, हे प्रकर्षाने समोर आले.आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. सर्वसामान्य माणसाला दोनवेळचे अन्न मिळावे म्हणून अंत्योदयसारखी योजना आणली. सामान्य माणसाला या योजनांचा कोणताही लाभ मिळत नाही. डोंबाऱ्यासारख्या उपेक्षित इतर घटकाला न्याय मिळणार कधी? हा खरा प्रश्न आहे. - बुध्दघोष गमरे, अध्यक्ष, पंचशील सामाजिक संस्था, चिपळूण
वितभर पोटासाठी ‘त्यां’ची हातभर धडपड
By admin | Published: September 23, 2015 9:52 PM