बांदा (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर दलदलयुक्त बनला आहे. मंगळवार सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली तरी आता पडझडीच्या घटना समोर येत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील घराची भिंत कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसात वाफोली येथील प्रकाश नारायण परब यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घरातील व्यक्ति याठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
बांदा परिसरात गेले ४ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. वाफोली येथील परब यांच्या घराची भिंत कोसळल्याने घरातील वस्तू व सामानाची नासधूस झाली. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
चार दिवसांनंतर काहीशी उघडीपमागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. मागील दोन दिवसांत तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा आळवाडी परिसरात पुराचे पाणी घुसले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने पूरपरिस्थिती ओसरली आहे. मात्र पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही.