कणकवली : ' शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो ' यासह विविध जोरदार घोषणा देत कणकवली भाजपाच्यावतीने कणकवली तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन छेडण्यात आले. विशेष म्हणजे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, सदस्य प्रकाश पारकर, महेश गुरव या भजनी बुवांनी धरणे आंदोलनात सरकारच्या विरोधात भजन, गजर सादर करत निषेध व्यक्त करून अनोखे आंदोलन छेडले.तसेच दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कणकवली तहसिलदार आर. जे. पवार यांना निवेदन देत शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार, घरबांधणी या मुद्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.कणकवली तालुका भाजपाच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन छेडण्यात आले.
या धरणे आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, सुरेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रदेश प्रतिनिधी प्रज्ञा ढवण, बांधकाम सभापती बाळा जठार, कणकवली सभापती दिलीप तळेकर, रविंद्र शेटये, सुहास सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, बबलू सावंत, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, वाघेरी सरपंच संतोष राणे, अजित नाडकर्णी, उपसभापती दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती महेश गुरव, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, संदीप सावंत, स्वप्नील चिंदरकर, किशोर राणे, संजिवनी पवार, एकनाथ कोकाटे, विजय भोगटे, सरपंच संघटना अध्यक्ष सुहास राणे, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, पं.स. सदस्य प्रकाश पारकर, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, संजय कामतेकर, अभय राणे, भालचंद्र साटम, मिलींद मेस्त्री, लक्ष्मण घाडीगांवकर, आबा सावंत, बाळा पाटील, संतोष पुजारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेया धरणे आंदोलनाच्यावेळी ' उध्दवा अजब तुझे सरकार, ढोल ताशांच्या गजरात या महाविकास आघाडीचा करतो निषेध़़, ठाकरे-ठाकरे तुझ्या गाडीला नाही चाकेरे , आघाडी सरकार बिघाडी सरकार... काही नाही कामाचे जनता मेली खड्यात गेली , आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ...जनतेच्या प्रश्नाला ... चला जाग आणू, या राज्य शासनकर्त्यांना, नवे सरकार आमचे नाय , साधे माणूस माहित नाय़, शेतकऱ्यांना छळणाऱ्या सरकारचा धिक्कार हाय.' अशा प्रकारे बुवा संतोष कानडे, प्रकाश पारकर, महेश गुरव, दिलीप तळेकर आदींसह कार्यकर्त्यांनी भजन रूपी गजर सादर करून सरकारचा निषेध केला. त्यामुळे कणकवली तहसिल परिसरात भजन आंदोलन चांगलेच रंगले होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर कणकवली तहसिलदार आर. जे. पवार यांना निवेदन दिले. त्यामध्ये भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसलेल्या ठाकरे सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या बागायतदारांना हेक्टरी २५ ते ५० हजार रूपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली. मात्र, अद्यापही ती मदत दिलेली नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू , असे सांगणाऱ्या सरकारने अद्याप एकही रूपया दिलेला नाही.
या कर्जमाफीत मध्य मुदतीचे कर्ज, पॉली हाऊस, शेड नेट, शेती अवजारे, पशुपालन, शेळी पालन यासारख्या कर्जाला माफी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांची घोर फसवणूक या सरकारने केली आहे. रस्ते व तिर्थक्षेत्र विकास आणि २५/१५ योजना, पाटबंधारे प्रकल्प कालव्यांच्या कामांना स्थगिती दिली ती त्वरीत उठवावी. ग्रामपंचयतींना पूर्वीप्रमाणे घर बांधकामाचे अधिकार देण्यात यावेत. महिला व युवतींवर होत असलेले अत्याचार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन दिल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी मार्गदर्शन केले.