मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील जागेत साकारण्यात येणारा जागतिक दर्जाचा सी-वर्ल्ड प्रकल्प एकीकडे विरोधाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे जागतिक दर्जाच्या प्रकल्पाचे महत्व जाणून दोन्ही गावातील संबंधित जमीन मालकांनी पुन्हा एकदा सी-वर्ल्ड व्हावा, असा सकारात्मक सूर आळवला आहे. सी वर्ल्ड याचठिकाणी साकारण्यात यावा, याबाबत काही भूधारक आग्रही बनले आहेत. येथील ग्रामस्थ वायंगणी-तोंडवळी ग्रामविकास समिती गठीत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.दरम्यान, आठवड्यापूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी वायंगणी-तोंडवळी येथील ग्रामस्थांनी जागा न दिल्यास जिल्ह्यातील अन्यत्र भागात सी-वर्ल्ड साकारला जाईल, अशी भूमिका मांडल्यावर मालवण तालुका भाजपच्यावतीने सी-वर्ल्ड हा तालुक्यातच व्हावा, या उद्देशाने हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. ग्रामविकास मंडळाचे शिष्टमंडळ लवकरच भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नेतृत्वाखाली व प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांची भेट घेणार असल्याचे मोंडकर म्हणाले.मालवण भाजपा कार्यालयात मोंडकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी प्रस्तावित प्रकल्पातील भूधारकांच्या समवेत मोंडकर यांची बैठक पार पडली. यात स्थानिक जमीन मालक व शासन-प्रशासन यांच्यात थेट सकारात्मक चर्चा व्हावी. जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा. गावाचा पर्यटन विकास आराखडा तयार व्हावा. एमटीडीसीने दोन्ही गावात अधिकृत कार्यालये स्थापन करावीत. जमीन मालक, कूळ अशा स्वरूपातील अडचणी दूर व्हाव्यात. याबाबत सर्वांना विश्वासात घेवून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या असल्याचे मोंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सी-वर्ल्डचा ३४१ एकरचा आराखडा तयारमोंडकर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालवण येथील जाहीर सभेत सी-वर्ल्ड प्रकल्प १३९० एकरवरून थेट ३५० ते ४०० एकरमध्ये साकारण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. पुणे येथील एका संस्थेला या जागेत प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार त्या संस्थेने प्राथमिक स्वरूपातील ३४१ एकर क्षेत्रातील कशा पद्धतीने सी-वर्ल्ड साकारला जावू शकतो याबाबत अहवाल तयार झाला आहे. तर सी वर्ल्ड प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणासाठी सुरुवातीच्या टप्प्यात शासनाकडून एमटीडीसीकडे १२० कोटी निधी प्राप्त झाला आहे.
‘सी-वर्ल्ड’ साठी जमीनधारक सकारात्मक
By admin | Published: May 29, 2016 11:33 PM