मिलिंद पारकर - कणकवली - वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींच्या उदात्तीकरणासाठी सुरू झालेला होलिकोत्सव सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही त्याला अपवाद नाही. पण यावेळच्या होलिकोत्सवाचे रंग बदलताना आढळत आहेत. सिंधुदुर्गात एकूण ६२२ खासगी तर ४९४ सार्वजनिक अशा १११६ ठिकाणी होलिकोत्सव साजरा होतो.होळीचे पारंपरिक स्वरूप कायम असले तरी होळी साजरी करण्याबाबत विविध मतप्रवाह निर्माण होत आहेत. सिंधुदुर्गात मानपानावरून होणाऱ्या वादातून काही गावांतील होळी उत्सवाच्या आनंदावर विरजण पडते आहे. मात्र ज्येष्ठांच्या पुढाकाराने या होळीचेही रंग बदलत आहेत. होळीसोबत जोडलेल्या रंगपंचमीचेही स्वरूप बदलते आहे. पारंपरिक होलिकोत्सव सिंधुदुर्गातील गावागावात साजरा होतो. गावागावात होळीचा मांड असतो. या मांडावर होळीच्या आदल्या दिवशी उंच झाड तोडून आणून उभे केले जाते. रोज रात्री मांडावर सोंगे आणली जातात. उत्सव साधारणत: पाच दिवस, काही ठिकाणी तो गुढीपाडव्यापर्यंत चालतो. रोंबटातून नाचा, मानकरी व धरकरी होळीची गाणी म्हणत मिरवणुकीने फिरतात आणि रात्री बोंब मारली जाते. कवळकाठी तोडून होळी पेटवत त्याभोवती वाद्ये वाजवत गाणी गातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन किंवा धुळवड साजरी होते. भरभरून देणाऱ्या निसर्गास वंदन करण्याचा प्रयत्न होतो. गावहोळीकडे रोंबाट मारले जाते. तसेच घरोघरी जाणाऱ्या रोंबटात नाचाच्या हातात तळी असते. ओवाळणी केल्यानंतर घरातून बिदागी मिळते. होळीच्या दिवसांत घरोघर सोंगे घेऊन जातात. यामध्ये ‘नाचे’ असतात. त्याचवेळी शबय मागितली जाते. होळीच्या दिवसांत मागितल्या जाणाऱ्या शबयचा मान ठेवून ऐपतीप्रमाणे बिदागी दिली जाते. होळी सणाच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. माणसाच्या भावनांचा निचरा करण्याची सोय होळी सणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या सणाच्या माध्यमातून वर्षभर बंधनात असलेला सज्जन माणूस थोडा मोकळा होतो. पूर्वी होळी सणात शिवराळपणा खूप होता. आता शहरीकरणाने हा भाग घटला आहे. घरोघरी सोंगे घेऊन जाण्यासही नव्या पिढीच्या मुलांना कमीपणा वाटू लागला आहे. - प्रा. जी. ए. बुवादिन विशेष---सिंधुदुर्गातील होळी परंपरेत ‘बोंब मारणे’, ‘रोंबाट’, ‘धुळवड’, ‘शबय’, ‘शिमग्यातील सोंगे’ हे भाग येतात. होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते.होळीच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात रंगपंचमी साजरी होते. पारंपरिक होळी साजरी करण्याबरोबरच यामध्ये अनेक गैरप्रकारांचा शिरकाव झाल्याने हिंदू जनजागृती समितीसारख्या संघटनेने आदर्श होळी साजरी करण्याचा उपक्रम सुरू केला. होळी सणात होणारे गैरप्रकार टाळून सण साजरा केला जावा, असा समितीचा उद्देश आहे. गेली पंधरा वर्षे आदर्श होळीचा उपक्रम सुरू असून वेंगुर्ले, शिरोडा-केरवाडा, कुडाळ आणि कणकवली येथे समितीतर्फे आदर्श होळी साजरी केली जाते. शेणाच्या गोवऱ्या, तूप टाकून होळी पेटवली जाते. पुरोहितांकडून या होळीची विधीवत पूजा केली जाते. तसेच यावेळी होळीनिमित्त जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, रंग टाकण्याची भीती घालून वाहनधारकांकडून पैसे गोळा करणे, रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंगांचा वापर करणे आदींबाबत प्रबोधन केले जाते. होळी साजरा करण्यामागील अध्यात्मिक महत्त्व विषद केले जाते. या उपक्रमाला दिवसेंदिवस समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
...इथे बदलताहेत होलिकोत्सवाचे रंग
By admin | Published: March 04, 2015 10:12 PM