वेंगुर्ला : येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे बीएचएमएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह तिघांना कॉलेजमधील दोघांसह अज्ञात पाचजणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित दोघांसह अन्य अज्ञात पाचजणांविरोधात वेंगुर्ला पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही मारहाण किरकोळ कारणावरून झाल्याचे समजते.याबाबत गणेश सुग्रीव जायभाय (२५, रा. बीड, सध्या रा. वेंगुर्ला) याने वेंगुर्ले पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ८) रात्री ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या दरम्यान सिद्धिविनायक हॉलसमोरील भागात घडली.यामध्ये शमन कनोजिया (सध्या रा. वेंगुर्ला, भटवाडी), संजय चव्हाण (रा.आंबेडकर वसतिगृह, वेंगुर्ला) यांनी तसेच अन्य अज्ञात पाचजणांनी हाताच्या थापटाने, दांड्याने मांडीवर मारहाण करून दुखापत केली तसेच धमकी दिली, असे गणेश जायभाय याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच यावेळी सोबत असलेल्या विशाल खांडेकर (रा. सोलापूर) व विजय दळवी (रा. बुलढाणा) यांनाही दुखापत व मारहाण केल्याचे तक्रारीत आहे.या घटनेबाबत दाखल तक्रारीनुसार शमन कनोजिया व संजय चव्हाण तसेच अन्य पाच अज्ञात अशा एकूण सातजणांविरोधात वेंगुर्ले पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
वेंगुर्ला येथील 'होमिओपॅथिक'च्या विद्यार्थ्यांना मारहाण, सातजणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:38 IST