रत्नागिरी : शिक्षणातून सुसंस्कृतपणा येतो तर नैतिकता पालकांकडून शिकवली जाते. नैतिकता जपणे तरूणाईच्या हातात आहे. तरूणांनी आपले आई-वडील, शिक्षकांबरोबरच राष्ट्राप्रति कृतज्ञ असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.रत्नागिरी नगरपालिकेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करियर मार्गदर्शन कार्यक्रमात सोलापूरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्षा स्मीतल पावसकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.जे मनापासून करावंस वाटतं ते करियर करावं. छंद व व्यवसाय एक झाले तरच गुणवत्ता दाखवू शकतात. बुध्द्यांकाचा संबंध कोठेही नसतो. त्यावर जगातील बुध्दिमान व्यक्ती ठरत नाही. त्यासाठी भावनात्मक वाढ गरजेची असते. अनेक पालक आपली स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, तसं न करता त्यांच्या स्वप्नांना दिशा दाखविणे गरजेचे आहे. विचाराची कवाडे खुली ठेवत असताना कुतूहल देखील कायम जागृत ठेवण्याची सूचना सोलापूरकर यांनी यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्षा स्मीतल पावसकर यांनी केले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी मनोगत व्यक्त करताना अडचणी दूर करून प्रयत्न करायला शिकवणारे शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आमदार उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना लोकमान्यांची जयंती साजरी करीत असताना, त्यांचे विचार वर्षभरात किती लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो ते महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
राहुल सोलापूरकर यांच्या मदतीने राज्यात शाळाशाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करून विवेकानंद, टिळक, सावरकरांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी, तसेच विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.